जिल्ह्यात रोजगार हमीची २४ हजार कामे अपूर्ण

कोणत्या तालुक्यात किती कामे अपूर्ण?
जिल्ह्यात रोजगार हमीची २४ हजार कामे अपूर्ण

अहमदनगर (प्रतिनिधी)

गत तीन वर्षापासून जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतील २३ हजार ८५० कामे अपूर्ण आहेत. अपूर्ण कामांमध्ये ८० टक्के म्हणजेच १८ हजार ९८५ कामे ही एकट्या घरकुल योजनेची आहेत. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने प्राधान्याने या कामांवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्चअखेर ही कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे.

रोजगार हमी योजनेत पूर्ण ठराविक कामे घेण्यात येत होती. मात्र, शासनाने वेळावेळी त्यात बदल करत वेगवेगळ्या नवीन कामांचा त्यात समावेश केला आहे. आता रोजगार हमी योजनेतून आधीच्या परंपारिक कामांसोबतच सिमेंट बंधारे, भूमिगत बंधारे, गॉबियन बंधारे, विहीर पुनर्भरण, शोषखड्डे, नाला, बांध, सलग समतल, पाझर तलाव दुरूस्ती, नालाखोलीकरण व रुंदीकरण, गाळ काढणे, वनीकरण व गट लागवड, शेतबांध बंदिस्त, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड, रोपवाटीका, सिंचन विहीर, शेततळे आणि सामुदायिक शेततळे, फळबाग लागवड, रेशम उत्पादन, विखुरलेली वृक्ष लागवड, घरकुल, शेळीपालन शेड, कुक्कुटपालन शेड, बचत गटाच्या जनावरांसाठी सामूहिक गोठे, मत्स्यपालन, नाडेप कंपोस्ट, व्हर्मी कंपोस्ट, अझोला उत्पादन, सार्वजनिक जागेवरील गोदाम, शौचालय ही कामे घेण्यात येत आहे.

अपूर्ण असणाऱ्या कामात २३ हजार ८५० पैकी १८ हजार ९८५ कामे घरकुलची आहेत. उर्वरित ४८६५ कामांमध्ये विहीर, शौचालय, शोषखड्डे, जनावरांचे गोठे, शेळी निवारा, रस्ते, रस्ता दुतर्फा लागवड, विहीर पुनर्भरण, विखुरलेली वृक्ष लागवड या प्रकारची आहेत. अपूर्ण असलेल्या कामांमध्ये २०१८ १९ पासून ते आज अखेरच्या कामांचा समावेश आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये सन २०१९-२० व त्यापूर्वीच ९ हजार ७५ कामे पूर्ण करण्याचे १ एप्रिल २०२१ रोजी देण्यात आले होते. त्यापैकी ३ हजार २५९ कामे मागील ६ महिन्यात पूर्ण केलेलीआहेत. उर्वरित ५ हजार ८१६ कामे पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. तर घरकुलांची जास्ती जास्त कामे मार्चअखेर पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांनी वेळेत बिल सादर न करणे, जुनी कामे, कामे मंजूर झाल्यानंतर आलेल्या तांत्रिक अडचणी, यासह अन्य कारणामुळे ती अपूर्ण राहत आहे. यात सर्वाधिक अडचणी या घरकुलाच्या कामात येत असून जागेपासून पूर्णत्वाचा दाखल, साहित्य वेळ उपलब्ध न झाल्याने ही कामे मोठ्या संख्येने अपूर्ण दिसत आहेत.

अपूर्ण कामे

अर्कोले १ हजार ८७४, जामखेड १ हजार २२७, कर्जत २ हजार ६४४, कोपरगाव १ हजार ४०५, नगर ७९३, नेवासा २ हजार ९९८, पारनेर १ हजार ३०२, पाथर्डी २ हजार ३२१, राहाता १ हजार ३१४, राहुरी ७१५, संगमनेर २ हजार ४२८, शेवगाव १ हजार ५७०, श्रीगोंदा १ हजार ९०६ आणि श्रीरामपूर १ हजार ३५३ कामांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.