श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

एकीकडे शहरातील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा प्रश्न गाजत असताना दुसरीकडे

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला प्रवरा कालव्याच्या पुलाजवळील सिद्धीविनायक चौक परिसरात 22 फूट उंचीचे भव्य शिवशिल्प उभारण्यात आले आहे. यामुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे.

शहरातील हिंदुत्ववादी संघटनांसह विविध संघटनांनी शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारावा, अशी मागणी केली आहे. सुमारे 40 वर्षांपासूनचा हा प्रश्न प्रलंबित आहे. आज ना उद्या अश्वारुढ पुतळा उभा राहील, अशी शिवप्रेमींची इच्छा आहे. पुतळा उभारण्याच्या प्रश्नावरून अनेकदा आंदोलने झाली आहेत. मात्र त्यास अद्याप मूर्त स्वरूप प्राप्त झाले नाही. त्यामुळे या प्रश्नावर शिवप्रेमींच्या भावना तीव्र आहेत.

या भावनांचा उद्रेक होऊन काही तरुणांनी शिवजयंतीदिनी भल्या पहाटे शिवाजी चौकात छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभारला होता. पोलीस व पालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करत पुतळा सुरक्षीतस्थळी हलविला. त्यानंतर नगरपालिकेने शिवाजी चौकातच पुतळा बसवावा, अन्यथा त्याचे परिणाम पालिकेला भोगावे लागतील, असा इशारा संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला. तसेच मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या दालनात हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी काल घेरावो आंदोलन केले.

दरम्यान, शिवजयंतीच्या पुर्वसंध्येलाच सिद्धीविनायक चौक परिसरात भव्य शिवशिल्प उभारण्यात आले. चौथर्यावर हाताचा मोठा पंजा व त्यावर छत्रपतींचा मुकूट तसेच समोरील बाजुस राजमुद्रा असलेले सुमारे 22 फूट उंचीचे हे शिवशिल्प आहे. त्यावर विद्युत दिवे बसविण्यात आले आहेत. तसेच बाजुला कुंपन व झाडे आहेत. सुमारे 10 लाख रुपये खर्चून हे शिवशिल्प उभारण्यात आले आहे. या भागातील नगरसेवक रवी पाटील यांच्या पुढाकारातून हे शिवशिल्प उभे राहिले आहे. भव्य शिवशिल्पामुळे या परिसरातील वैभवात भर पडली आहे. नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्याहस्ते शिवजयंतीदिनी या शिवशिल्पाचे अनावरण झाले.