पुणतांबा (वार्ताहर) -

परिसरात गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे गहू, हरभरा, कांदा या रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात

फटका बसण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी अर्धा इंच तर शनिवारी रात्री अंदाजे दीड इंच पावसाची नोंद झाली आहे. चालू पावसाळ्यात आतापर्यंत साडेतेहतीस इंच पावसाची नोंद झाल्याची माहिती शेती महामंडळाच्या चांगदेवनगर मळ्यावरील लिपिक सुनिल कराळे यांनी दिली. पुणतांबा परिसराचे सरासरी पर्जन्यमान 25 इंच आहे. मात्र पावसाने सरासरी केव्हाच ओलांडली आहे. गेल्या 38 वर्षात प्रथमच विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे अद्यापही परिसरातील ओढे, नाले, बंधारे तुंड्ब भरून वाहत आहेत. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण तसेच थंडी गायब झाल्यामुळे परिसरातील द्राक्ष बागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे नुकसान झाले तर आता अवकाळी पावसामुळे रब्बी पिकेही हातून जाण्याची वेळ आल्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. पावसामुळे परिसरातील ऊस तोडीचे नियोजन विस्कळीत झाले आहे. येथील योगीराज चांगदेव महाराज मंदिराकडे जाणार्या स्त्यालगत असलेल्या ऊस तोडणी कामगारांच्या तांड्यावरही अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात दलदल निर्माण झालेली दिसून येत होती. अनेक कामगारांचे संसारोपयोगी साहित्य ओले झाले होते. पावसाने चिखल झाल्यामुळे रात्रीचे झोपायचे कुठे या विवंचनेत कामगार, त्यांची लहान मुले दिसून येत होती.

रविवारी सकाळी मात्र मोठ्या प्रमाणात धुके पडले होते. अवकाळी पाऊस धुके तसेच ढगाळ वातावरण यामुळे रब्बी पिकाची शाश्वती नसल्याची खंत शेतकरी संजय जाधव, संजय धनवटे, डॉ. बखळे, बाळासाहेब जाधव यांनी व्यक्त केली आहे.