जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करोना
सार्वमत

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करोना

पुरवठा विभागात दोघांना बाधा : 31 जुलैपर्यंत कार्यालय सील

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसारात असणार्‍या जिल्हा पुरवठा विभागात करोनाचा शिरकाव झाला आहे. या ठिकाणी काम करणार्‍या दोन कर्मचार्‍यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून 31 जुलैपर्यंत पुरवठा विभागाचे कार्यालयीन कामकाज बंद राहणार आहे.

सुरुवातीच्या काळात जिल्ह्यात करोनाच्या संक्रमणाला ब्रेक लागलेला होता. जूनपासून शहरासह जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनादेखील करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट होत आहे. नगररचना, महापालिका, जिल्हा परिषद या ठिकाणी काही कर्मचार्‍यांना यापूर्वी करोना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यातच गुरुवारी जिल्हा पुरवठा विभागातील दोन कर्मचार्‍यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

दक्षतेचा उपाय म्हणून कार्यालयातील 30 अधिकारी-कर्मचार्‍यांचे स्त्राव तपासले आहेत. दोन बाधित कर्मचार्‍यांव्यतिरिक्त इतरांचे अहवाल निगेटिव्ह आले. बाधित कर्मचार्‍यांना आयसोलेशन विभागात दाखल करण्यात आले, तर निगेटिव्ह आलेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांना खबरदारी म्हणून होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे 31 जुलैपर्यंत पुरवठा विभाग बंद राहणार आहे.

झेडपीच्या साहेबांच्या शिपायाचे कुटूंब पॉझिटिव्ह

जिल्हा परिषदेत एका वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या कार्यालयातील कर्मचारी करोना पॉझिटिव्ह झालेला असतांना आता या ठिकाणी असणार्‍या बड्या साहेबांच्या कार्यालयात कार्यत शिपायाचे अख्ये कुटूंब करोना पॉझिटिव्ह आले आहे. विशेष म्हणजे संबंधीत शिपाई याचा सुदैवाने अहवाल निगेटिव्ट आला आहे. यामुळे जिल्हा परिषद कर्मचार्‍यांमध्ये सध्या दहशतीचे वातावरण आहे.

Deshdoot
www.deshdoot.com