
सोनई |वार्ताहर| Sonai
सोनई सह परिसरात वृद्धापकाळाने, अल्पशा आजाराने व अकस्मात मृत्यू असे मागील आठ दिवसांत गुरुवार दि 15 पर्यंत एकूण 18 मृत्यू झालेले असल्याने परिसरातील कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
बुधवारी एकाच दिवशी पाच मृत्यू झाले. त्यात बालाजी मंदिराजवळील निर्मला कुसळकर व निकिता नन्नवरे या मायलेकी धुणे वाळत घालत असताना व स्टेट बँकेजवळ टेलीफोनच्या वायरचे काम करत असताना बाळासाहेब खोसे असे एकूण तिघे विजेचा धक्का बसून मृत्यूमुखी पडले. बेल्हेकरवाडी रस्त्यावरील विहिरीत रूणाली घोरपडे व कौठा येथे विषारी औषध घेऊन सोनाली जावळे या युवतीने आत्महत्या केली. माधवबाबा चौकातील सोनम पवार या मुलीचे प्लेटलेट्स कमी झाल्याने हे सर्व पाच मृत्यू एकाच दिवशी झालेले आहेत.
मागील काही दिवसांत जुना वांबोरीरोडचे गोरे व बोबडे सोनईतील परदेशी, निमसे व मुंगसे, पानसवाडी येथील लोणारी व धनगर, गणेशवाडीचे बडे व बेल्हेकर, कांगोणी रस्त्याचे रौंदळ तसेच मुस्लिम समाजाचे शेख, पठाण कुटुंबातील तीन असे एकूण 18 मृत्यू झाल्याने या सर्वच कुटुंबांवर दुःखाचे आभाळ कोसळले आहे. करोना नंतर आताची ही सर्वात मोठी घटना असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अलिकडच्या काळात आठ दिवसांत एवढ्या मोठ्या प्रमाणावर मृत्यूची संख्या प्रथमच असल्याचे अंत्यविधी साहित्य विक्रेते ऋषिकेश जंगम यांनी सांगितले.
परिसरात घबराट
सोनई ग्रामपंचायत मार्फत ध्वनीक्षेपकावरून परीसरात कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्याचे नाव, अंत्यविधीचे ठिकाण व वेळ कळवण्याची सोय केलेली आहे. या आठ दिवसांत थोड्या थोड्या वेळाने मृत्यूची नोंद सांगण्यात येत असल्याने परिसरात घबराट पसरून ग्रामस्थांत चर्चेला उधाण आले आहे.