सोनईत डेंग्यूमुळे 17 वर्षीय मुलीचा मृत्यू

आरोग्य विभाग व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बळी
सोनईत डेंग्यूमुळे 17 वर्षीय मुलीचा मृत्यू

सोनई (वार्ताहर)

सोनईत दोन महिन्यापासून साथीच्या आजाराने थैमान घातले असून डेंग्यू आजारांचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी 17 वर्षीय प्रणिता नंदू काकडे या मुलीचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने सोनई आरोग्य विभाग व प्रशासनावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

नंदू काकडे हे छोटासा व्यवसाय चालवत पत्नी, मुलगा व मुलीसह विठ्ठल मंदिर परिसरात राहतात. काही दिवसांपासून प्रणिता व तिची आई आजारी असल्याने त्यांच्यावर सोनईत खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्या. यात डेंग्यू आजाराचे निदान झाले व आजाराला फरक पडत नसल्याने अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रणिताची प्रकृती खालावल्याने तिला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. मात्र या दरम्यान गुरूवारी प्रणिताचा रुग्णालयात मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणाची बळी ही मुलगी ठरल्याचे ग्रामस्थात बोलले जात आहे.

सोनई येथील आरोग्य विभागात तीन वैद्यकीय अधिकारी आहेत तीन अधिकारी असूनही त्यांची आरोग्य केंद्रात येण्या जाण्याची वेळ निश्‍चित नाही. त्यात रोज एकच अधिकारी हजर असतात. डॉक्टर येण्यापर्यंत रूग्णाला ताटकळत बसावे लागते. डॉक्टर आल्यानंतरही तपासणी झाल्यानंतर बर्‍याच वेळा हॉस्पिटलकडे औषधे शिल्लक नसल्याचे सांगत औषधे बाहेरून घेण्याचे डॉक्टर सांगतात. त्यामुळे बरेच गरीब रूग्ण परिस्थिती नसतानाही खासगी रुग्णालयात उपचारासाठी पोटाला चिमटा घेऊन भरमसाठ पैसे खर्च करत असल्याचे सांगतात.

दोन महिन्यापासून परिसरात अनेकरूग्ण डेंगू आजारावर उपचार घेत आहे. डॉक्टर लॅबमध्ये रक्ताचे नमुने पाठवतात लॅबमधून एका किटच्या सहाय्याने स्टेटस ऍक्टिव्ह नॉन ऍक्टिव्ह असा रिपोर्ट देतात. या आधारावर डॉक्टर उपचार करतात. याविषयी माहिती घेतली असता या किटची 100 टक्के खात्री नसल्याचे जाणकार सांगतात मग डॉक्टर कोणत्या आधारे पेशंटला डेंग्यूचे उपचार देतात? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

कुटूंबाचा आक्रोश

प्रणिताचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटूंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला. मृत्यूची बातमी गावात कळताच ग्रामस्थांना धक्का बसला. गावातील आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय यंत्रणेवर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com