अहमदनगर (प्रतिनिधी) -

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत शासनाने दिलेल्या मंजुरीनुसार आणि जिल्ह्यांकडून प्राप्त झालेल्या मागणीनुसार

470 कोटी 90 लाख 24 हजार रुपयांचा निधी राज्यातील सर्व जिल्ह्याधिकार्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यात नगर जिल्ह्यासाठी 17 कोटी 2 लाख 67 हजार रुपयांचा समावेश आहे. याबाबतचे परिपत्रक नियोजन विभागाने जारी केले आहे.

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमासाठी 2019-20 या आर्थिक वर्षात सर्व जिल्हाधिकार्यांना निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यापैकी 31 मार्च 2020 अखेर झालेला खर्च वजा जाता जिल्ह्यांनी शासनास समर्पित केलेल्या निधीपैकी जिल्ह्यांनी मागणी केल्यानुसार 476 कोटी 87 लाख 21 हजार रुपयांचा निधी 2020-21 मध्ये पुन्हा उपलब्ध करून देण्यासाठी विधानमंडळाच्या डिसेंबर 2020 च्या हिवाळी अधिवेशनात पूरक मागणी मंजूर करण्यात आली आहे. पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पीत केलेला निधी वितरीत

करण्यापूर्वी वित्त विभागाची सहमती घेणे आवश्यक असल्याने प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यात आला होता. त्यास शासन मंजुरीनुसार व जिल्ह्यांकडून प्राप्त मागणीनुसार 470 कोटी 90 लाख 24 हजार रूपये संबंधित जिल्हाधिकार्यांकडे सपूर्द करण्यात येत आहे. हा निधी बीम्स संगणक प्रणालीद्वारे वितरीत करण्यात आला आहे. हा निधी 31 मार्च 2021 पूर्वी खर्च करण्यात यावा असे निर्देशही देण्यात आले आहेत.