
शिर्डी | शहर प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त शिर्डी शहरात भव्य जयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून यानिमित्ताने शहरात १३१ वृक्षारोपण तसेच १३१ युवक रक्तदान करणार असल्याची माहिती जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष नितीन शेजवळ यांनी दिली.
दरम्यान दि.१४ एप्रिल रोजी शिर्डी शहरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. कोविडच्या कारणांमुळे गेल्या दोन वर्षापासून थोर पुरुषांच्या जयंती उत्सव साजरा करण्यात आले नाही. यावर्षी करोनाची लाट ओसरली असून देशात सर्वत्र लसिकरण करण्यात आले आहे.
त्यापार्श्वभुमिवर राज्य सरकारने कोव्हिडचे नियम अटीशर्ती शिथिल केल्या आहेत. त्यामुळे दोन वर्षानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. शिर्डी शहरात हा उत्सव साजरा करतांना यंदाच्या वर्षी सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे.
यामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप याबरोबरच गरीब विद्यार्थ्यांची शैक्षणिक फि भरणे, अनाथ आश्रमात फळे वाटप, रांगोळी स्पर्धा, शहरातून शोभायात्रा अशा उपक्रमांनी यंदाचा जयंतीउत्सव साजरा होणार असल्याचे अध्यक्ष नितीन शेजवळ यांनी सांगितले.