
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात व्हाव्यात, यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, महसूल, पोलीस प्रशासन चांगलेच कामाला लागले आहेत. बारावीच्या मंगळवारी झालेल्या पहिल्याच पेपरमध्ये कॉपी रोखण्यासाठी जिल्हा पातळीवरून, तालुका पातळीवरून परीक्षा केंद्रावर पथके धाडण्यात आलीत. दुसरीकडे बारावीच्या पहिल्याच पेपरला 63 हजार 171 परीक्षार्थींपैकी 1 हजार 215 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. तर कॉपीची सात प्रकरणे समोर आली.
जिल्ह्यात मंगळवारपासून बारावीच्या परीक्षांना सुरूवात झाली. यंदाच्या परीक्षेच्या वैशिष्ट्यात कॉपी रोखण्यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासन देखील मैदानात उतरले आहे. जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी 108 परीक्षा केंद्र आहेत. या केंद्रावर कॉपी रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. गेल्या महिनाभरापासून कॉपीमुक्त परीक्षेसाठी शासकीय यंत्रणा काम करत आहेत. यासाठी यापूर्वी कॉपीच्या जादा घटना होणार्या तालुक्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. इंग्रजी, गणित आणि विज्ञानाच्या पेपरमध्ये कॉपीचे प्रमाण अधिक असल्याने या पेपरच्या वेळी जादा दक्षता घेण्यात येत आहे.
कालच्या इंग्रजीच्या पेपरसाठी जिल्हास्तरावरून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि प्राथमिक, शिक्षणाधिकारी योजना (निरंतर), प्राचार्य डायट, उपशिक्षणाधिकारी यांच्या सात पथकांसह 14 तालुक्यांचे तहसीलदारांचे 14 पथके, तसेच गटविकास अधिकारी यांच्या नियंत्रणात 14 तालुक्यात प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठक पथक आणि जिल्हा परिषदेच्या 15 विभाग प्रमुखांचे असे एकूण 50 पथके कॉपी रोखण्यासाठी नेमण्यात आले होते. दरम्यान, बारावीच्या पहिल्याच पेपरला 1 हजार 215 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. तर पाथर्डी तालुक्यातील श्री वसंतदादा विद्यालयात कॉपीची पाच आणि राहाता तालुक्यातील प्रवरानगरच्या महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये कॉपीची दोन असे सात प्रकरणे सापडली आहेत.
विद्यालयनिहाय गैरहजर
नगर रेसिडीशियल स्कूल आणि न्यू आर्ट ज्युनिअर कॉलेज 115, श्रीरामपूर सोमय्या हायस्कूल 57, कोपरगाव एस.जी विद्यालय 63, पाथर्डी एम. एम. निर्हाळी 223, कर्जत महात्मा गांधी विद्यालय 59, अकोले कनिष्ठ विद्यालय 74, शेवगाव रेसिडिन्शल हायस्कूल 75, नेवासा सुंधराजी गांधी विद्यालय 46, राहुरी विद्या मंदिर प्रशासला 48, पारनेर न्यू इंग्लिश स्कूल 53, श्रीगोंदा श्रीमंत महादजी शिंदे विद्यालय 68, जामखेड ल. ना. हॉशिंग विद्यालय 53, राहाता सेंट जॉन विद्यालय 55, नगर शहर दादा चौधरी विद्यालय 61, संगमनेर मालपाणी विद्यालय अकोले नाका 65, नेवासा घोडेश्वरी विद्यालय घोडेगाव 33 आणि संगमनेर डॉ. डी.ए. आहेर ज्यूनिअर कॉलेज 67 असे आहेत.