साखर कामगारांची दिवाळी होणार गोड

राज्यातील साखर कामगारांच्या 12 टक्के वेतनवाढीचा मार्ग मोकळा; शासन निर्णय जारी
साखर कामगारांची दिवाळी होणार गोड

नेवासा | सुखदेव फुलारी

शासन प्रतिनिधी, साखर कारखाना प्रतिनिधी व कामगार संघटना प्रतिनिधींचा समावेश असलेल्या त्रिपक्षीय समितीच्या सामंजस्य करारानुसार राज्यातील साखर कामगारांना 12 टक्के वेतनवाढ देण्याबाबतचा शासन निर्णय उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने निर्गमित केल्याने वेतनवाढीचा मार्ग मोकळा झाल्याने साखर कामगारांची दिवाळी गोड होणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी दि.12 नोव्हेंबर 2020 रोजी राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांचे अध्यक्षतेखाली त्रिपक्षीय समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर समितीच्या काही बैठक होऊन ही वेतनवाढ देण्याबाबत कारखाना प्रतिनिधी व कामगार प्रतिनिधी यांच्या एकमत न झाल्याने शेवटी माजी केंद्रीय कृषी मंत्री खा.शरद पवार यांना याबाबद निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार दि.9 सप्टेंबर 2021 रोजी खा.शरद पवार यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन राज्यातील साखर कामगारांना 12 टक्के वेतनवाढ द्यावी असे सुचवले होते.

त्यानुसार दि.4 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेऊन राज्यातील साखर कारखान्यांमधील कामगारांच्या मागण्याबाबत सामजंस्य करार झाला. हा करार महाराष्ट्रातील साखर व उपपदार्थ उद्योगातील दिनांक 1 एप्रिल 2019 रोजी हजेरी पत्रकावर ववेतनश्रेणीत पगार घेत असलेल्या सर्व कायम, हंगामी कायम व हंगामी कामगारांना लागू करण्यात आला आहे. या करारानुसार आता या कामगारांना अस्तित्वात असलेल्या मूळ पगार, महागाई भत्ता, स्थिर भत्ता मिळून 12 टक्के पगारवाढ करण्यात आली आहे.

याबाबतचा शासन निर्णय दि.29 ऑक्टोबर रोजी निर्गमित करण्यात आला आहे.या निर्णयान्वये दिनांक 1 एप्रिल 2019 रोजी संबंधित कामगारांच्या वेतनश्रेणीत 12 टक्के पगारवाढ म्हणजे अस्तिवात असलेल्या पगाराच्या 12 टक्के देण्यात येणार आहे. या शिवाय फिटमेंट बेनिफिट देण्यात येणार आहे. तृतीय वेतन मंडळाने सूचविलेली वर्गवारी व वेतनश्रेणी आणि स्थिर भत्ता यापूर्वी स्वीकारण्यात आले आहे. त्यात स्थिर भत्ता पूर्ण रूपयात करून घेतलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता अधिनियम-1983 अन्वये घरभाडे भत्ता प्रदान करण्यात येणार आहे. तथापि, जे कामगार / कर्मचारी कारखान्यामार्फत दिलेल्या घरात राहतात, त्याला घरभाडे भत्ता देय नसणार आहे.

उपरोक्त शासन निर्णयानुसार दिनांक 1 एप्रिल 2019 पासून रात्रपाळीत (तिसरी पाळी) काम करणाऱ्यांना/हजर असलेल्या प्रत्येक रात्रीपाळीसाठी 26 रूपये प्रमाणे रात्रपाळी भत्ता प्रचलित पद्धतीनुसार लागू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सर्व कामगारांना ग्रेडप्रमाणे दरमहा धुलाई भत्ता आणि दरमहा 308 रूपये वैद्यकीय भत्ता देय करण्यात आला आहे. स्त्री कामगारांना मॅटर्निटी बेनिफिट अधिनियमानुसार रजा देय करण्यात आली असून कामगार कामावर असतांना अपघात होऊन मयत झाल्यास, कायम अपंगत्व आल्यास एका वारसाला कामावर घेण्याचे अनुकंपा धोरण लागू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे रजा व पगार सुट्ट्या, गणवेश वाटप, प्रवासभत्ता, वाहनभत्ता, दैनिक भत्ता, ग्रुप ग्रॅच्युईटी विमा योजना, कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी, कारखान्याच्या विश्रामगृह सवलती आदी लागू करण्यात आला आहे.या व्यतिरिक्त नोकरीच्या कालावधी प्रमाणे एकाच कारखान्यात 6 वर्षे सलग नोकरी झालेल्या कामगाराला 1 जादा वेतवाढ,14 वर्षे सलग नोकरी झालेल्या कामगाराला 2 जादा वेतवाढ,21वर्षे सलग नोकरी झालेल्या कामगाराला 3 जादा वेतवाढ मिळणार आहे.राज्यातील सर्व सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना या कराराची अंमलबजावणी करणे बंधन कारक आहे.

शासन निर्णय निघाला असला तरी ही शासननिर्णय निघाल्यानंतरच्या कोणत्या महिन्यापासून 12 टक्के वेतनवाढ लागू करायची आणि तिथं पर्यंतच्या फरकाची रक्कम कधी द्यायची याचा निर्णय मात्र त्या त्या कारखान्याचे व्यवस्थापनाने स्थानिक प्रतिनिधीक कामगार संघटनेशी करार करावयाचा आहे.

राज्यातील साखर कामगारांना 12 टक्के वेतनवाढ देण्याचे निर्णयाचे श्रेय जेष्ठ खा.शरद पवार,समितीचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक,सरचिटणीस नितीन पवार,महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे,कार्याध्यक्ष अविनाश आपटे व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाचे चिटणीस कॉ.आनंद वायकर यांचेसह राज्यस्तरीय साखर कामगार संघटनांच्या इतर प्रतिनिधींना आहे अशी प्रतिक्रिया राज्य साखर कामगार फेडरेशनचे उपाध्यक्ष रामनाथ गरड,खनिजदार डी. एम.निमसे, संपर्क प्रमुख सुखदेव फुलारी, नेवासा तालुका साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोकराव पवार यांनी दिली.

अशी असेल निर्धारीत वाढ...

अ.नं.-- वर्गवारी--निर्धारित वेतनवाढ रुपये--धुलाई भत्ता रुपये

1) अकुशल --2132--167

2) निमकुशल--2146--176

3) कुशल-ब --2168--262

4) कुशल-अ--2192--206

5) अतिकुशल--2215--297

6) कारकून(4)--2167--262

7) कारकून (3)--2191--206

8) कारकून (2)--2215--302

9) कारकून(1)--2239--213

10)सुपरवायझरी(सी)--2239--208

11)सुपरवायझरी(बी)--2263--317

12) सुपरवायझरी(ए)--2311--204

----------------------------------------------

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com