11 महिन्याच्या बाळाची करोनावर मात

11 महिन्याच्या बाळाची करोनावर मात

कर्मवीर शंकरराव काळे कोविड सेंटरमध्ये घेतले उपचार

कोपरगाव (प्रतिनिधी) - मागील काही दिवसांपासून करोना बाधित रुग्णांची वाढत असलेली संख्या चिंतेचा विषय झाली होती. करोनाच्या तिसर्‍या लाटेमध्ये लहान मुलांना जास्त धोका असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र कोपरगाव तालुक्यात अकरा महिन्याच्या बाळाने करोनाला हरविले आहे.

एस.एस.जी.एम.महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरु करण्यात आलेल्या कर्मवीर शंकरराव काळे कोविड सेंटरमध्ये अकरा महिन्याच्या बाळावर उपचार करण्यात येवून या बाळाने करोनावर मात केली आहे.

कोपरगाव शहरात मोलमजुरी करणार्‍या कुटुंबातील चारही व्यक्ती करोना बाधित झाले होते. यामध्ये पती, पत्नी, पंधरा वर्षाचा एक मुलगा व एका अकरा महिन्याच्या बाळाचा समावेश होता. हे कुटुंब साईबाबा तपोभूमी येथे कोविड सेंटरमध्ये दाखल झाले होते. अकरा महिन्याचे बाळ असलेल्या त्या मातेला ऑक्सिजनची गरज असल्यामुळे हि माता आपल्या बाळासह एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या कर्मवीर शंकरराव काळे कोविड सेंटरमध्ये उपचार घेत होती. मागील आठ दिवस डॉ. कृष्णा फुलसौंदर, डॉ. सौ. वैशाली बडदे, डॉ आसिफा पठाण, डॉ. वरद गर्जे, डॉ. कुणाल घायतडकर, डॉ. दीपक पगारे यांनी यशस्वी उपचार करून या अकरा महिन्याच्या बाळाला व त्याच्या आईला कोरोनामुक्त केले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रुग्ण सेवा हीच ईश्‍वर सेवा समजून वैद्यकीय सेवा करीत आहे. मागील काही दिवसांपासून करोनाचा विळखा घट्ट बसल्यामुळे साहजिकच ताण वाढला होता. मात्र आज 11 महिन्याच्या बाळावर यशस्वी उपचार करून हे बाळ करोनामुक्त होऊन आपल्या आईच्या कुशीत हसताना पाहून सगळा ताण निघून गेला.

- डॉ. वैशाली बडदे.

संपूर्ण कुटुंब करोना बाधित असल्याचे समजताच धक्काच बसला. आमदार आशुतोष काळे यांनी उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झालो. मात्र मला ऑक्सिजनची आवश्यकता असल्यामुळे मला एस.एस.जी.एम.महाविद्यालयाच्या कोविड सेंटरमध्ये उपचार देण्यात आले. मी पूर्णपणे बरी देखील झाले. उपचार घेण्यासाठी घरात पैसे नसताना देखील कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटरमुळेच आज मी, माझे बाळ व माझे कुटुंब पूर्णपणे बरे होवून घरी जात आहे.

- बाळाची आई

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com