103 वर्षाच्या आजीबाईंनी बजावला शेवटचा मतदानाचा हक्क

‘अशोक’च्या मतमोजणीपुर्वीच खोकरच्या आजीबाईंचे निधन
103 वर्षाच्या आजीबाईंनी बजावला शेवटचा मतदानाचा हक्क

भोकर |वार्ताहर| Bhokar

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत वयाच्या 103 व्या वर्षी आजीबाईंनी मतदान केले. आणि काल मतमोजणीच्या दिवशीच सकाळी इहलोकीचा निरोप घेतला. मतदानाचा निकाल लागण्यापुर्वीच त्यांचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ताईबाई खंडेराव भणगे (वय 103, रा. खोकर, ता. श्रीरामपूर) असे या आजीबाईंचे नाव आहे. अशोक सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवड प्रक्रीयेत रविवारी दि. 16 रोजी त्यांनी वयाच्या 103 व्या वर्षी त्यांनी मतदान केले. ताईबाई खंडेराव भणगे या सन 1992 साली अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सभासद झाल्या. तेव्हापासून कालपर्यंत त्यांनी सहा वेळा मतदान केले. भणगे कुटुंबियाची पुर्वीपासून माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्यावर विश्वास असल्याने भणगे कुटूंबीय व माजी आ. मुरकुटे यांचे अतूट नाते तयार झाले आहे.

निवडणुकीनिमित्ताने यावर्षी त्यांना वयाच्या 103 व्या वर्षी सहाव्यांदा मतदानाची संधी मिळाली, रविवारी त्यांनी आपले नातू सतिष व नामदेव यांच्याबरोबर खोकर येथील गोरक्षनाथ माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. कदाचीत अशोक सहकारी साखर कारखान्यात वयाच्या 103 व्या वर्षी मतदान करणार्‍या सर्वात ज्येेष्ठ मतदार असाव्यात.

खोकर येथे दि. 16 जानेवारी रोजी आजींबाईनी मतदान केले आणी काल दि. 17 जानेवारी रोजी या मतदानाची मतमोजणी झाली. परंतु दुर्भाग्य काल मतमोजणी होण्यापुर्वीच सकाळी 8.25 वा. त्यांना देवाज्ञा झाली. मतमोजणीचा निकाल ऐकण्याचे भाग्य आजीबाईंना न लाभल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ताईबाई भणगे यांचे पश्चात दोन मुलगे, चार मुली, सुना, जावई, नातवंडे, नातसुना व परतवंडे असा परिवार आहे. खोकर येथील शेतकरी कारभारी भणगे व बाळासाहेब भणगे यांच्या त्या मातोश्री तर सतिष भणगे यांच्या आजी होत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com