श्रीरामपुरातील 10 वर्षीय मुलास खा. शिंदे यांच्याकडून दोन लाखांची मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते धनादेश प्रदान
श्रीरामपुरातील 10 वर्षीय मुलास खा. शिंदे यांच्याकडून दोन लाखांची मदत

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

विजेचा शॉक लागून हात पाय निकामी झालेल्या दहा वर्षीय मुलाच्या शिक्षणाची खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जबाबदारी घेत त्याला कृत्रीम हात पाय बसविण्यासाठी दोन लाख रुपयांची मदत केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते या रकमेचा धनादेश नुकताच मुंबई येथे एका कार्यक्रमात त्याला प्रदान करण्यात आला.

श्रीरामपूर शहरातील गुलाम गौस (वय 10) हा मुलगा घरावरील इलेक्ट्रिक तारेला लटकलेला पतंग गजाच्या सहाय्याने काढत असताना त्याला शॉक लागला. त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी तीन-चार लाख रुपये खर्च करूनही या मुलाचा एक हात व एक पाय निकामी झाला. परंतु एक पाय आणि एक हात कृत्रिम पद्धतीने बसून मिळावा ही त्या मुलाची अपेक्षा असल्याने कुटुंबाने शहरातील नागेबाबा शाखेतील आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड यांच्याकडे आपली व्यथा मांडली. श्री. गायकवाड यांनी त्वरित मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्ष प्रमुख मंगेश चिमटे यांच्याशी संपर्क साधून मुलगा व कुटुंबीय मुख्यमंत्री सहायता निधीच्या विभागात घेऊन दाखल झाले.

त्यांनी मुंबईचे रुग्णमित्र विनोद साडविलकर, धनंजय पवार, श्रद्धा आष्टीकर, गणेश सोनवणे, राजेंद्र ढगे, राजेंद्र गोसावी यांच्या मदतीने मदत कक्षाचे प्रमुख श्री. चिवटे व सहकारी यांच्या निर्दशनास आणून दिले त्यांनी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावला. या मुलाची सर्व शिक्षणाची जबाबदारी डॉ. खा. श्रीकांत शिंदे यांनी उचलली. तसेच तात्पुरत्या स्वरूपात या मुलास दोन लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना वैद्यकिय मदत कक्षाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते प्रदान केला. यावेळी गुलाम गौस तसेच त्याचे आजोबा अफजल कुरेशी, आरोग्यमित्र सुभाष गायकवाड, रुग्णमित्र गणेश सोनवणे उपस्थित होते.

यावेळी नागेबाबा प्रतिष्ठानचे आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्रिपुरा बिहारचे माजी राज्यपाल डि. वाय. पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, शंभुराजे देसाई, बंदरे व म. व्य. मंत्री दादा भुसे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, अतुल सावे, माजी मंत्री राम शिंदे, खा. सदाशिव लोंखडे, शहाजी बापू पाटील, ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख नरेश म्हस्के, खा. धैर्यशिल माने, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. एस. टी. टाकसाळे, डॉ. विजय सुरासे, डॉ. संजय ओक, संतोष आंधळे, संदीप आचार्य, विशाल बडे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com