नियमित 1 मे ला शालेय द्वितीय सत्र समाप्तीची घोषणा करावी

मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांना निवेदन
नियमित 1 मे ला शालेय द्वितीय सत्र समाप्तीची घोषणा करावी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शालेय नियोजनानुसार परीक्षा घेऊन, नियमीत 1 मे रोजी द्वितीय सत्र समाप्ती व जून 2022 मध्ये शाळा सुरू करण्याबाबतची तारीख घोषित करण्याची मागणी राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे, महिला आघाडी प्रमुख वैशाली नाडकर्णी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना दिले आहे.

शिक्षक परिषदेने यापूर्वी मार्चमध्ये 1 मे रोजी शैक्षणिक सत्र समाप्तीची घोषणा करण्याची मागणी केली होती. मात्र शासनाने 24 मार्च रोजी या वर्षीच्या परीक्षा व निकालाबाबत शासन आदेश निर्गमित केला आहे. त्यानुसार परीक्षा घेऊन निकाल तयार करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध होणार नाही. शाळेच्या नियोजनाप्रमाणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून अनेक शाळांनी परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे.

त्यामुळे 15 एप्रिल पर्यंत राज्यातील सर्व शाळांचे सर्व इयत्तांची परीक्षा संपत आहे. त्यामुळे उर्वरित काळामध्ये उत्तरपत्रिका तपासणे, निकाल तयार करणे यासाठी काही दिवसांचा कालावधी आवश्यक असतो. अनेक शाळांनी निकालाच्या तारखा यापूर्वीच घोषित केलेल्या आहेत. त्यामुळे अनेक पालकांनी एप्रिलमध्ये तिसर्‍या आठवड्यापासून व त्याअगोदरच उन्हाळी सुट्टीत गावी जाण्याचे आरक्षण केलेले आहे. त्यामुळे 24 मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार एप्रिलच्या तिसर्‍या आठवड्यात परीक्षा घेण्यास पालक, शाळा व शिक्षकांनी विरोध दर्शविला आहे. तसेच संबंधितांना नव्याने आरक्षण मिळणार नाही. त्यातच मागील दोन वर्षांत करोनामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांना गावी जाता आलेले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.