टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

टाकळीभान येथील श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गालगत दुतर्फा झालेले अतिक्रमण सार्वजनिक बांधकामकडून हटविण्यात यावे, अन्यथा 2 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा भाजपाचे मुकुंद राजाराम हापसे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपूर ते नेवासा राज्यमार्ग 44 वर टाकळीभान परिसरामध्ये रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृतपणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर दुकाने टाकून अतिक्रमण करण्यात आले आहे. यामध्ये एस.टी.स्टॅन्ड परिसर, गावठाण रोड, गाव सुरू होणेपासून ते संपेपर्यंत राज्यमार्गालगत मुख्य बाजारपेठेत बहुतांश व्यावसायिकांनी दुकाने टाकली आहेत.

त्यामध्ये स्लॅबचे पक्के बांधकाम, दुमजली इमारती, शेड व पत्रा, साधे गाळे तसेच काही ठिकाणी मॉल टाकून व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण करतेवेळी सार्वजनिक बांधकामची पूर्व परवानगी न घेता अगोदर कच्ची व नंतर पक्की बांधकामे केलेली आहेत. ही सर्व अतिक्रमणे बेकायदेशीर आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाने 2 आक्टोंबर 2020 पूर्वी ही अतिक्रमणे हटवावीत. अन्यथा दि. 2 ऑक्टोबर 2020 रोजी गांधी जयंतीच्या दिवशी आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा हापसे यांनी दिला आहे.

टाकळीभान येथील टाकळीभान-घोगरगाव रस्त्यालगतची सावता मंदिराजवळील अनधिकृत बांधकामं पाडण्याची मागणी गेल्या महिन्यात भाजपाचे बापुसाहेब शिंदे यांनी केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने मोजमाप करुन 15 दिवसांत आतिक्रमण हटवण्याचे लेखी आदेश या रस्त्यालगतच्या सुमारे 180 गाळेधारकांना दिलेले आहेत. त्याची मुदत 22 ऑगस्ट रोजी संपली आहे. ही मुदत संपण्यापुर्वीच भाजपाच्याच मुकुंद हापसे यांनी श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गालगतचे अतिक्रमण हटवण्यासाठी उपोषणाचा इशारा दिल्याने येथील व्यापारी वर्गात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.