शिर्डीत रॅपिड टेस्टिंगला प्रारंभ; आढळले नऊ नवे संक्रमित

शिर्डीत रॅपिड टेस्टिंगला प्रारंभ; आढळले नऊ नवे संक्रमित

शिर्डी|शहर प्रतिनिधी|Shirdi

शिर्डीत करोनाचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत आहे. काल मंगळवारी सकाळी पानमळा आणि प्रसादनगर भागातील बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात 21 पैकी पाच जणांचे अहवाल जागेवर पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे. काल शहरात एकूण 9 जण करोना बाधित झाल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान यामध्ये 5 बाधित व्यक्ती शहरातील उच्चभ्रू नागरी वस्ती असलेल्या प्रसादनगरमधील आहे तर 4 बाधित रुग्ण पानमळा येथील आहे. प्रसादनगरमधील एक जण संस्थानचा वॉचमन असल्याचे समजले. रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळून आलेले पाचजण हे बाधित व्यक्तीच्या संपर्कातील असून त्यांना तात्काळ साईआश्रम कोव्हिड केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे.

शिर्डीत करोना व्हायरसचा वेगाने प्रसार होत असून नागरिकांनी करोनाची साखळी तोडण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची नावे प्रशासनाला कळवावी असे आवाहन नगरपंचायतीच्यावतीने करण्यात येत आहे.

शिर्डी शहरात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले असून काल मंगळवारी शहरात तब्बल नऊ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये प्रसादनगरमधील पाच तर इतर चार व्यक्तींचा समावेश आहे प्रसाद नगर कंटेन्मेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.नगरपंचायतीच्या आरोग्य विभागाच्यावतीने तातडीने हायपो क्लोराइडची फवारणी करण्यात आली आहे.

प्रसादनगर येथील रहिवाशांनी वेळीच सतर्कता बाळगून प्रशासनाला कळविल्याने याठिकाणी पाच रुग्ण बाधित आढळून आले त्यामुळे भविष्यातील संभाव्य धोके टळले आहेत. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गोकुळ घोगरे, डॉ. स्वाती म्हस्के, शिर्डी नगरपंचायतीचे नोडल अधिकारी मुरलीधर देसले, अग्निशमन विभागाचे श्री लासुरे यांनी तातडीने येथील लोकांशी संपर्क करून त्यांची रॅपीड टेस्ट केली. यामध्ये 19 पैकी 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून या रुग्णांना उपचारासाठी केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान रॅपिड टेस्टमुळे करोना आटोक्यात येण्यास मोठी मदत मिळेल, असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गोकुळ गोरे यांनी व्यक्त केला. प्रसाद नगर येथील रहिवासी सचिन वाणी, राम डहाळे, राजेंद्र कटारे, सार्वमतचे पत्रकार राजकुमार जाधव आदींनी समयसूचकता दर्शवीत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याने करोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी मदत मिळाली. यावेळी नगरपंचायतचे नवनाथ गोंदकर, संतोष शेजवळ यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com