लोणी |प्रतिनिधी| Loni

योजनांच्या अंमलबजावणीत शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे वेगळेपण राज्यात दिसून येते. यासाठी गावपातळीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये

संघटनेच्या माध्यमातून असलेला समन्वयच विकासाच्या प्रक्रियेला दिशा देणारा ठरत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

करोनाच्या संकटानंतर प्रथमच जनसेवा मंडळ कार्यकर्त्यांची सहविचार सभा माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आ. विखे पाटील यांनी तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांबरोबरच करोना संकटात सर्वांनी एकत्रित येऊन केलेल्या कामाचा आढावा घेतला.

लोकाभिमुख योजनांची अंमलबजावणी प्रभावी झाल्यामुळेच राहाता पंचायत समितीचा गौरव राज्य पातळीवर झाला. बाजार समितीने करोना संकटातही आपले व्यवहार सुरळीतपणे सुरू ठेवून शेतकर्यांना दिलासा दिला. थेट लिलाव करण्याची पध्दत राज्यात प्रथम आपण सुरू केल्यामुळेच इतरांना त्याचे अनुकरण करावे लागले.

याकडे लक्ष वेधून आ. विखे यांनी सांगितले की, करोनाचे संकट आल्यानंतर गावातील कार्यकर्त्यांनी सक्रीयपणे समाजाला आधार दिला. गावांचे निर्जंतुकीकरण करण्यापासून ते गरजू लोकांना अन्नधान्य घरपोच देण्यासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे या मोठ्या संकटावर आपण मात करू शकलो. प्रवरा ग्रामीण रुग्णालय डॉ. विखे पाटील हॉस्पिटलची मोठी मदत समाजाला झाली असल्याचे नमूद केले.

शैक्षणिक संस्थाच बंद राहिल्याने विद्यार्थ्यांपासून ते संस्थामधील कर्मचार्यांवर आलेल्या संकटाची जाणीव आपल्याला निश्चित आहे. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय करून दिलासा देण्याची ग्वाही दिली. एकीकडे काही शैक्षणिक संस्थांमध्ये पैसै घेवूनही नोकर्या न देण्याची आणि फसवणूक करण्याची प्रकरणे समोर आल्याचे आपण पाहतो.

परंतु आपल्याकडे परिसरातीलच युवकांना संधी देऊन गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे सुरू असलेले काम वेगळेपण दाखवून देत असल्याचे ते म्हणाले. गावात सामाजिक एकोपा चांगला राखण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात असलेला सुसंवादच विकासाची प्रक्रीया पुढे नेण्यासाठी पोषक ठरत असल्यानेच आपल्या मतदारसंघाचे वेगळेपण राज्यात प्रभाव निर्माण करणारे ठरत असल्याचे ते म्हणाले.

अण्णासाहेब म्हस्के पाटील म्हणाले की, छोट्या मोठ्या कामातूनच गावातील नेतृत्व तयार होत असते. काम करणार्या कार्यकर्त्याला समाज पाठबळ देत असतो. पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी सामूहिक विकासाच्या प्रक्रियेची सुरू केलेली परंपरा पुढे घेऊन जाण्यातच खरे हीत असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी सभापती नंदाताई तांबे, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजूरकर, गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, रामभाऊ भुसाळ, कैलास तांबे, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, शहराध्यक्ष सचिन शिंदे, प्रवरा बँकेचे चेअरमन बाळासाहेब भवर, चेअरमन नंदकिशोर राठी, उपसभापती उमेश जपे, बाळासाहेब जपे, जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी निघुते, दिनेश बर्डे, पंचायत समितीचे सदस्य संतोष ब्राम्हणे, गुलाबराव सांगळे, दिपाली डेंगळे, शांतिनाथ आहेर, बाळासाहेब आहेर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना आ. विखे पाटील म्हणाले की, या निवडणुका गावपातळीवरच्या असल्याने बिनविरोध कशा होतील यासाठी ज्येष्ठ आणि तरुण कार्यकर्त्यांनी समन्वयाने निर्णय करावेत. गावपातळीवर निवडणुका पार पाडताना लोकसहभाग, सामंजस्य व एकोपा टिकवून ठेवावा. निवडणूक संपल्यानंतर त्याचा गावाच्या विकासावर विपरीत परिणाम होतो याची जाणीव ठेवून सहमतीने निवडणुका पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले.