नगरच्या उपबाजार समितीमधील कांदा लिलाव 15 ऑगस्टपर्यंत बंद
सार्वमत

नगरच्या उपबाजार समितीमधील कांदा लिलाव 15 ऑगस्टपर्यंत बंद

व्यापार्‍याचा करोनामुळे मृत्यू : 17 ऑगस्टपासून कामकाज पूर्ववत

Arvind Arkhade

अहमदनगर |वार्ताहर| Ahmednagar

करोनाची लागण झाल्यामुळे नगरच्या बाजार समितीतील व्यापार्‍याचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर व्यापार्‍यांनी 15 ऑगस्टपर्यंत कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत नगर भाजीपाला, फळफळावळ आडते असोसिएशनच्यावतीने दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सचिव यांना निवेदन दिले आहे.

नगर बाजार समितीत करोनाचा शिरकाव झाल्यामुळे आडते, व्यापारी व कर्मचार्‍यांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. शहरासह जिल्ह्यात करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. तसेच 100 पेक्षा अधिक लोकांचा बळी गेला आहे.

नगर बाजार समितीतील संचालकांसह, अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, आडत्यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यातच एक प्रतिष्ठीत व्यापारी यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच व्यापारी, कर्मचारीही बाधित असल्यामुळे करोना साखळी तोडण्यासाठी नेप्ती बाजार समितीतील कांदा लिलाव सोमवार 10 ते 15 ऑगस्ट 2020 पर्यंत कांदा लिलाव बंद ठेवून नेप्ती उपबाजार समितीत औषध फवारणी करावी. घनकचरा उचलण्याची व्यवस्था करावी. सोमवार 17 ऑगस्टपासून कांदा लिलाव पूर्ववत सुरु करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

करोना साथ रोगाचा प्रादुर्भाव झाल्यापासून नेप्ती बाजार समितीत कांदा लिलाव झाल्यानंतर फवारणी करण्यात येते. करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने आठवडाभर नेप्ती उपबाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून भाजी मार्केट सुरू रहाणार आहे.

- अभिलाष घिगे, सभापती नगर बाजार समिती

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com