देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravara

वर्गणी द्या, नाही तर तुम्ही देशद्रोही आहात. रामराम करण्याऐवजी जय श्रीराम म्हणा, असे सांगितले जाते. हे नवे खंडणीखोर भाजपाचे पुढारी आहेत.

वर्गणीच्या नावाखाली खंडणी गोळा केली जात आहे. भावनात्मक लाटा तयार करून सत्ता काबीज करण्याचा यांचा डाव आता जनतेच्या लक्षात आला आहे. खोटारड्या लोकांचे खरे रुप जनतेला कळाले आहे. हीच ताकद आपल्याला नगरपरिषदेवर झेंडा फडकविण्यास उपयोगी पडणार आहे. येणार्या निवडणुकीत काँग्रेस आपला झेंडा देवळाली प्रवरा नगरपरिषदे वर फडकावल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले.

येथील काकासाहेब चौकात आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृष्णा मुसमाडे होते. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, देशाची सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेसला मजबूत करणे गरजेचे आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गेली 40 वर्षे काँग्रेसमध्ये राहून सहकाराच्या माध्यमातून काँग्रेसची विचारधारा पुढे नेली. मोदी सरकारमुळे ईस्ट इंडिया कंपनीकडे देशाची वाटचाल सुरू असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण म्हणाले, आम्ही 2001 ते 2006 या काळात देवळाली प्रवरा शहराचा अमुलाग्र बदल करून राज्यात व देशात नावलौकिक मिळविला. काँग्रेसच्या काळात शहराचा विकास झाला. त्याच आयत्या पीठावर रेघा मारून बक्षीस मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधारी करीत आहेत. जे काम आमच्या काळात झाले ते या चार वर्षांत झाले नसल्याचे नागरिकांनी अनुभवले आहे. डिसेंबरमध्ये होणार्या निवडणुकीत काँग्रेस पालिकेवर झेंडा फडकाविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी श्रीरामपूर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर, गणपतराव सांगळे, ज्ञानदेव वाफारे, अंकुश कानडे, राजेंद्र बोरुडे, कुमार भिंगारे, जयेश माळी, गिताराम बर्डे यांनी भाजपावर सडकून टीका केली. प्रास्ताविक काँग्रेस शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे यांनी केले तर आभार व सूत्रसंचालन वैभव गिरमे यांनी केले.

मेळाव्यास ज्ञानेश्वर मुरकुटे, अरुण नाईक, अशोक खुरुद, अमृत धुमाळ, सुखदेव मुसमाडे, नानासाहेब कदम, उत्तमराव कडू, कुणाल पाटील, भाऊराव कांगुणे, संजय पोटे, एकनाथ मुसमाडे, दत्तात्रय मुसमाडे, वसंत कदम, दीपक पठारे, सुनील कदम, रंगनाथ ढूस, मयूर अडागळे, कारभारी होले, राजेंद्र लांडगे, बाबासाहेब चव्हाण, इंदूमती खांदे, भाग्यश्री कदम, महिलांसह नागरिक उपस्थित होते.