श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

कोव्हिडची पुन्हा लाट येण्याची भीती व्यक्त होत असलेल्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुका प्रशासनाने रस्त्यावर उतरून

मास्क वापराबाबत जागृती निर्माण केली याबाबत आ.कानडे यांनी कौतुक करत पोलीस प्रशासनाने ग्रामपातळीपासून शहरापर्यंत पोलिसांचे पथक तयार करून बेशिस्त लोकांच्यावर कारवाई करण्यासोबतच करोना प्रतिबंधासाठी काम करणारे अधिकारी कर्मचार्यांना पाठबळही दिले पाहिजे असे प्रतिपादन आ. लहू कानडे यांनी केले.

श्रीरामपूर तहसील कार्यालयाच्या सभागृहात आ. लहू कानडे यांनी तालुका प्रशासनाची समन्वय सभा घेतली. यावेळी सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी सभेला उपस्थित होते. यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील यांनी सर्व अधिकार्यांना त्यांच्याकडील योजनांचा आढावा देण्याबाबत सुचवले.

याप्रसंगी आ. कानडे यांनी सांगितले की, सरकारी व निमसरकारी कार्यालयातील कर्मचार्यांनी तालुका स्तरापासून ते गावपातळीपर्यंत लोकसेवकांनी मास्क वापरले पाहिजे आणि तोंडावरील मास्क न काढता कार्यालयांमध्ये येणार्या व्हीजीटर्सना तसेच समाजामध्ये वावरताना विना मास्क आढळणार्या नागरिकांना मास्क वापरा म्हणून विनंती केली पाहिजे, असेही त्यानी सांगितले.

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश बंड यांनी तेथील सेंटरची माहिती दिली, तर प्रभारी कार्यभार असणार्या वैद्यकीय अधिकार्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील करोनाविषयक सद्यस्थितीची माहिती दिली. मुख्याधिकारी शिंदे यांनी मागील बैठकीमध्ये दिलेल्या सूचनांनुसार नगरपरिषदेने सुरू केलेल्या प्रचार व प्रसार मोहिमेची माहिती देताना लवकरच जनजागृतीसाठी फलक लावण्यात येणार असल्याची माहिती दिली.

नगरपालिका कर्मचार्यांनी पथके तयार करून आरोग्यविषयक बाबींची दैनंदिन पाहणी करावी, तसेच विनामास्क आढळणार्या नागरिकांना मास्क वापरण्याच्या आवाहनासोबतच दंड वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे सुचविले. महावितरण कंपनीच्या वीज बिल वसुलीचा मुख्य बाबींचा आढावा घेतला. उपअभियंता अमित कांबळे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नवीन वीज धोरणांची माहिती दिली.

तसेच तालुक्यामध्ये कृषी पंपांची 128 कोटींची थकबाकी असून चालू बाकी 5.28 कोटी असल्याचे सांगितले. वसुलीसाठी प्रतिसाद मिळत असला तरी आतापर्यंत केवळ एक कोटीपर्यंत वसुल झाली असल्याचे सांगितले. आमदार कानडे यांनी शेतकर्यांना पूर्वसूचना देऊन व नवीन धोरणाबाबत अवगत करूनच चार-आठ दिवसांची मुदत देऊनच वीजबिल वसुली करावी.

मोठ्या प्रमाणावर अधिक क्षमतेचे ट्रान्सफार्मर बसवणे, नवीन डीपी बसवणे, नवीन विद्युत कनेक्शन देणे ही सर्व शेतकरी हिताची कामे वसूल होणार्या रकमेतून केली जाणार असल्याचे पटवून द्यावे, असे आवाहन केले. मार्चअखेरपर्यंत सर्व विभागाने विविध योजनांची लक्ष्येे पूर्ण करावीत तसेच बजेटमधील कामे याच वर्षात पूर्ण करावीत. शासन दरबारी प्रलंबित असणार्या बाबींची माहिती देत समन्वय ठेवावा. नव्या कल्पक योजनाही प्रस्तावित करण्यात कराव्यात असे सुचविले.

याप्रसंगी माजी सभापती इंद्रभान पाटील थोरात, उपनगराध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक करण ससाणे, शहराध्यक्ष संजय छल्लारे, ज्ञानेश्वर मुरकुटे, सतीश बोर्डे, राजेंद्र औताडे यांच्यासह उपस्थित पोलीस अधिकारी श्री. मिटके, प्रांताधिकारी अनिल पवार, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. काचोळे, गटविकास अधिकारी श्री. आभाळे, मुख्याधिकारी शिंदे, कृषी विभागीय अधिकारी साळी, वैद्यकीय अधीक्षक डॉ.बंड व विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.