कांद्याला प्रति किलो 30 रुपये भाव द्या

कांद्याला प्रति किलो 30 रुपये भाव द्या

नाशिक । प्रतिनिधी

यावर्षीही मागील वर्षाप्रमाणे नाफेडकडून शेतकर्‍यांचा कांदा खरेदी करतांना जर 8 ते 10 रुपये प्रति किलोचा दर देणार असेल तर महाराष्ट्रातून नाफेडला एक किलोही कांदा घेऊ देणार नाही,अशी भूमिका महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी घेतली आहे.

नाफेड दरवर्षी कांद्याचा बफर स्टॉक करण्यासाठी राज्यातील काही ठराविक बाजार समित्यांमधून कांदा खरेदी करत असते. गेल्या चार-पाच वर्षांपासून बाजार समित्यांच्या खरेदीसह काही फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनाही नाफेडने कांदा खरेदीचे अधिकार दिलेले आहेत.

मागील वर्षी नाफेडच्या एक लाख मेट्रिक टन कांदा खरेदी पैकी महाराष्ट्रातून 75 हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला होता. त्यावेळी नाफेडकडून शेतकर्‍यांच्या कांद्याला प्रति किलो आठ रुपये ते अकरा रुपये इतका दर देण्यात आला होता.

फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांनाही नाफेडणे हाच दर ठरवून दिल्याने त्यांच्याकडूनही शेतकर्‍यांच्या कांद्याला वरीलप्रमाणे दर मिळाला होता. परंतु , नाफेडची कांद्याचा दर ठरवण्याची ही पद्धत महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मान्य नसून यावर्षी महाराष्ट्रात नाफेड मार्फत शेतकर्‍यांकडून जी काही कांदा खरेदी केली जाणार आहे, तो कांदा प्रति किलो 30 रुपये या दराने खरेदी करावा अन्यथा महाराष्ट्रातून नाफेडला एक किलोही कांदा घेऊ दिला जाणार नाही.

मागील वर्षी नाफेडने स्वतः व फार्मर प्रोड्युसर कंपन्यांमार्फत जो काही कांदा खरेदी केला त्यावेळेस शेतकर्‍यांना मिळालेला दराच्या पाचपट म्हणजेच कांद्याचे बाजार भाव वाढल्यानंतर 40 ते 50 रुपये किलोने विक्री केला गेला.नाफेडचे काम हे काही नफा कमावण्याचे नाही तर कांद्याचे दर अचानक वाढल्यानंतर देशात ग्राहकांना स्वस्तात कांदा पुरविण्यासाठी किमती स्थिरीकरण योजनेअंतर्गत खरेदी करत असते.

परंतु, मागीलवर्षी शेतकर्‍यांकडून घेतलेल्या कांद्याला नंतर मात्र पाचपटीने भाव भेटल्यानंतर नाफेडकडून संबंधित शेतकर्‍यांना कुठलाही वाढीव मोबदला देण्यात आला नव्हता. ही कांदा उत्पादक शेतकर्‍यांची उघड-उघड फसवणूकच आहे. त्यामुळे यावर्षी महाराष्ट्रात नाफेडला जो काही कांदा खरेदी करावयाचा असेल त्यासाठी नाफेडने शेतकर्‍यांच्या कांद्यास कमीत कमी 30 रुपये प्रति किलोचा दर द्यावा.ही ठाम भूमिका महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून घेतली जाणार आहे.

केवळ ठराविक जिल्ह्यांतूनच कांद्याची खरेदी न करता राज्यातील सर्वच कांदा उत्पादक जिल्ह्यांतून नाफेडने शेतकर्‍यांचा कांदा खरेदी करावा,असेही भारत दिघोळे यांनी यावेळी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com