नाशिक । Nashik

जिल्हा परिषद सेवेतील विविध संवर्गातील हजारो सेवकांची सेवा ज्येष्ठतेची प्रारूप यादी १ जानेवारीला जाहीर करण्यात आली. या यादीमुळे सेवकांच्या पदोन्नती व वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.यावर्षी प्रथमच शासन आदेशाप्रमाणे एक जानेवारी रोजी यादी प्रसिध्द झाली आल्याने सेवकांमधून आनंद व्यक्त होत आहे.

दरवर्षी सेवकांची सेवाज्येष्ठता यादी १ जानेवारी रोजी प्रसिध्द करावी, असा शासकीय नियम असला, तरी अनेकदा शासकीय कार्यालयांमध्ये दोन-दोन वर्षे सेवकांची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिध्द केली जात नाही. परिणामी, त्यातून सेवकांना कालबध्द पदोन्नती, वेतनश्रेणीचा प्रश्न निर्माण होतो.

मात्र, जिल्हा परिषदेने यंदा प्रथमच एक जानेवारी रोजीच सेवा ज्येष्ठतेची प्रारूप यादी प्रसिध्द करण्याचा निर्णय घेऊन, त्या दृष्टीने गेल्या काही दिवसांपासून तयारी केली जात होती. प्रत्येक सेवकाचा सेवेत दाखल झालेल्या दिवसांपासूनची इत्यंभूत माहिती या यादीच्या निमित्ताने अद्ययावत केली जाते.

जिल्हा परिषदेच्या कृषी, पशुसंवर्धन, सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत, शिक्षण, बांधकाम, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, लघु पाटबंधारे या विभागातील विविध संवगार्तील म्हणजे परिचर, वाहन चालकापासून ते थेट सहायक प्रशासन अधिकाऱ्यांपर्यंतच्या सर्व सेवकांची यादी प्रसिध्द करण्यात आली असून,

या यादीतील त्रुटी अथवा दोषाबाबत एक महिन्यात हरकत घेण्याची मुदत आहे. त्यानंतर अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी दिली.