करोना
करोना
नाशिक

जि.प. शिक्षण विभागात करोनाबाधित आढळल्याने खळबळ

अनेक विभाग सील

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील काही दिवसांपूर्वी एक सेवक कोवीड पॉझिटीव्ह आढळल्यानंतर यंत्रणेचे धाबे दणाणले होते. यानंतर येथील नियमावली कडक केल्यानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच बुधवारी पुन्हा एक सेवक शिक्षण विभागात पाझिटीव्ह आढळल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे.

प्रशासनाने तातडीने उपाययोजना करीत माध्यमिक शिक्षण विभाग, शेजारील पाणीपुरवठा विभाग आणि आवश्यक ते विभाग सील करून येत्या सप्ताहाअखेरपर्यंत हे विभाग सील केले आहेत. शहर आणि जिल्ह्यात अद्यापही करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात काही दिवसांपूर्वी करोनाचा शिरकाव झाल्यानंतर युध्दपातळीवर उपाययोजना करण्यात आल्या होत्या. आजवर लॉकडाऊनच्या काळात जिपच्या विषय समित्यांच्या बैठकाही ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आल्या. अभ्यागतांनाही सध्या जिल्हा परिषदेत प्रवेश बंद करण्यात आला आहे.

यामुळे मुख्यालयात काही दिवसांपासून वातावरण सुनेसुने होते. दोन दिवसांपूर्वी कृषीमंत्र्यांनी जिल्हा परिषदेस भेट देत आरोग्य व कृषी विभागाचा आढावा प्रत्यक्ष बैठकीव्दारे घेतला होता. यावेळी मोठ्‌या प्रमाणावर लोकप्रतिनिधी, अधिकारी, कार्यकर्ते व विविध कर्मचाऱ्यांची वर्दळ अचानक जिल्हा परिषदेच्या आवारात वाढली होती. करोनाच्या धास्तीने धास्तावलेले वातावरण हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच आता नव्याने एका पॉझिटीव्ह सेविकाची भर पडल्याने या धास्तीत आणखीच भर पडली आहे.

यास जिल्हा परिषदेतील सुत्रांनी दुजोरा दिला. रविवारपर्यंत शिक्षण व पाणीपुरवठा विभागांसह काही विभाग बंद करण्यात आले आहेत. रूग्ण आढळलेल्या विभागातील कार्यालय आणि इमारत सॅनीटाईझ करण्याचे काम सुरू करण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com