जि.प. वादग्रस्त औषध साहित्य खरेदी; आरोग्य सभापती दराडे यांनी सोडले मौन

खरेदीवरून शुक्रवारची स्थायी सभा गाजणार ?
जि.प. वादग्रस्त औषध साहित्य खरेदी; आरोग्य सभापती दराडे यांनी सोडले मौन
जि.प.

नाशिक । Nashik

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील चर्चेत असलेल्या औषध साहित्य खरेदीवरून अखेर आरोग्य सभापती सुरेखा दराडे यांनी मौन सोडले.औषध खरेदी प्रक्रीयेची निष्पक्ष चौकशी करण्याची तसेच फेरनिविदा काढून प्रक्रीया राबविण्याची मागणी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्याकडे सभापती दराडे यांनी केल्याचे समजते.

आरोग्य विभागाने करोना संकटात केलेल्या कोटयवधी रूपयांच्या खरेदी प्रक्रीयेवर आमदार दिलीप बनकर यांनी आढावा बैठकीत संशय व्यक्त केला होता. त्यानंतर, भाजप गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी औषध व सहित्य खरेदी चढया दराने करण्यात आल्याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याकडे केली. राष्ट्रवादीचे सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी खरेदी प्रक्रीयेची माहिती मागविली असता यात मोठ्या प्रमाणात अनियमता झाली असल्याचा आरोप केला.

प्रशासने नियम व अटी डावलून शासनाचे नुकसान केल्याची तक्रार त्यांनी केली. सभापती संजय बनकर यांनी या खरेदी प्रक्रीयेची विभागीय आयुक्तांकडे थेट तक्रार करत चौकशीची मागणी केली.दरम्यान, जिल्हा दौऱ्यावर आलेले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे देखील या वादग्रस्त औषध खरेदीची तक्रार सदस्यांनी केली. त्यामुळे आरोग्य विभागातील कामकाजावर प्रश्न उपस्थित होत होते. मात्र, आरोग्य सभापती दराडे यांनी याबाबत प्रतिक्रीया दिलेली नव्हती.

अखेर, गुरूवारी (दि.३०) सभापती दराडे यांनी यासंदर्भात अध्यक्ष क्षीरसागर यांची भेट घेतली. या भेटीत सभापती दराडे यांनी वादग्रस्त औषध सहित्य खरेदीवर प्रश्न उपस्थित करत पदाधिकाऱ्यांवर आरोप होत असल्याने खुली नाराजी व्यक्त केली. याबाबत अध्यक्ष या नात्याने स्पष्टीकरण देण्याची गरज असल्याची भावना त्यांनी बोलून दाखविल्याचे समजते.

तसेच या खरेदी प्रक्रीयेवर सदस्यांकडून प्रश्न उपस्थित होत असल्याने या खरेदी प्रक्रीयेची चौकशी करण्याची मागणी दराडे यांनी अध्यक्ष क्षीरसागर यांच्याकडे केल्याचे समजते. ..

खरेदीवरून आजची स्थायी गाजणार

जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा सभागृहात घेण्याची मागणी असताना, शुक्रवारी (दि.३१) आॅनलाईन होणारी स्थायी समितीची बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. बैठकीत आरोग्य विभागातील वादग्रस्त औषध साहित्या खरेदीसह प्रशासनाच्या दुटप्पी कामकाजावर आक्रमक झालेले सदस्य प्रशासनाला कोंडीत पकडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.

स्थायी सभा घेण्यास प्रशासनाकडून होत असलेल्या टाळटाळवर, सदस्य आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सदस्यांमध्ये आहे. यातच काही सदस्यांनी थेट आंदोलन करण्याची तयारी केल्याचे समजते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com