निफाडनामा : जि.प., पं.स.ची निवडणूक नेते, कार्यकर्त्यांसाठी प्रतिष्ठेची

निफाडनामा : जि.प., पं.स.ची निवडणूक नेते, कार्यकर्त्यांसाठी प्रतिष्ठेची

निफाड | आनंदा जाधव Niphad

गेल्या दोन वर्षापासून करोना प्रादुर्भावामुळे लांबलेल्या निवडणुका elections नवीन वर्षाच्या प्रारंभीच होत आहे. साहजिकच पिंपळगाव, लासलगाव बाजार समितीच्या निवडणुकीनंतर लागलीच जि.प. चे 10 गट तर पं.स. च्या 20 गणांसाठी निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार आहे.

त्यातच कोणत्या गटासाठी व गणासाठी कोणते आरक्षण निघणार यावर बरेच अवलंबून असले तरी देखील जि.प. सह पं.स. चे तालुक्यातून सर्वाधिक आपले सदस्य निवडुन यावे यासाठी आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. मात्र असे असले तरी गत पाच वर्षात तालुक्याच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाल्याने निवडणुकीची गणिते देखील बदलण्याची शक्यता असून गट व गण आपल्याच अधिपत्याखाली रहावे यासाठी सत्ताधार्‍यांसह विरोधकांनी कंबर कसल्याने यावेळच्या निवडणुका तितक्याच चुरशीच्या होण्याचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहे.

सहकार आणि राजकारणात सजग तालुका म्हणून निफाडची Niphad ओळख आहे. तसेच जिल्ह्यात सर्वाधिक गट आणि गण देखील याच तालुक्यात असल्याने जि.प. ची सत्ता कुणाच्या हाती सोपवायची याचा फैसला याच तालुक्यात केला जातो. सध्या जि.प. च्या राजकारणाचा विचार करता भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जि.प. त शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अशी आघाडी होत जि.प. अध्यक्षपद शिवसेनेकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर विषय समित्याचे समान वाटप अशी काहिशी परिस्थिती तर निफाड पं.स. त सर्वाधिक 10 सदस्य शिवसेनेचे निवडलेले असल्याचे भाजपच्या मदतीने पाच वर्ष सत्ता सांभाळण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे.

तालुक्यातून जि.प. मध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक 5 सदस्य निवडून गेले तर त्यानंतर शिवसेनेचे 3, भाजप 1, अपक्ष 1 असे बलाबल असून ओझर गटातून निवडलेले अपक्ष यतीन कदम आता भाजपवासी झाले आहे. तर त्यांचेबरोबर पं.स. अपक्ष निवडून गेलेले नितिन पवार, नितिन जाधव यांनीही यतीन कदमांना साथ केली आहे. तर अपक्ष निवडलेल्या मीनाक्षी कराड या स्वगृही राष्ट्रवादीत परतल्या आहेत. तर ज्या नानासाहेब पाटलांनी भाजपच्या तिकिटावर डी.के. जगताप यांना जि.प. त पाठविले त्याच नानासाहेब पाटील व डी.के. जगताप यांचे आता विळ्या-भोपळ्याचे नाते तयार झाले आहे. तसे पाहता तालुक्यात मातब्बर नेत्यांचा भरणा सर्वाधिक आहे.

.सध्या जि.प. चे अध्यक्षपद शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर यांचे रूपाने तालुक्यात आहे. ही शिवसेनेसाठी जमेची बाजू तर दुसरीकडे जि.प. चे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, मुंबई बाजार समिती संचालक जयदत्त होळकर, सिद्धार्थ वनारसे, सुरेश कमानकर, राजेंद्र डोखळे, शिवाजी ढेपले, हरिश्चंद्र भवर असे बिनीचे शिलेदार राष्ट्रवादीकडे आहे. तर भाजपची सारी मदार यतीन कदम, डी.के. जगताप यांचे खांद्यावर असून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजाराम पानगव्हाणे, तालुका अध्यक्ष मधूकर शेलार, दत्तात्रय डुकरे हे देखील याच तालुक्यातील.

त्यामुळे येथे प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवायची असल्याने आगामी जि.प. व पं.स. ची निवडणूक तेवढीच रंगतदार होण्याचे संकेत मिळत आहे. त्यातच आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माजी आमदार अनिल कदम यांना सर्वाधिक सदस्य निवडून आणावे लागणार आहे. तर तालुक्यावर आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी आमदार दिलीप बनकर रात्रीचा दिवस करतील यात शंका नाही. तर तरूण चेहरा म्हणून यतीन कदमांना देखील आपले अस्तित्व दाखविण्याची संधी यामुळे मिळणार आहे. त्यामुळे जि.प., पं.स. साठी तिरंगी किंवा चौरंगी लढती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मात्र राज्य पातळीवरून भाजपला रोखण्यासाठी आघाडी करण्याचे संकेत दिल्यास येथे आजी-माजी आमदारांची पंचाईत होण्याची शक्यता आहे. मात्र तालुक्यात तरी अशी युती वा आघाडी होण्याची शक्यता कमी आहे. गत पाच वर्षात कादवा, गोदा, दारणा, विनिता नदीपात्रातून बरेच पाणी वाहून गेल्याने तालुक्याचे राजकारण देखील बदलले आहे. राष्ट्रवादीचे अनिल कुंदे शिवसेनेत गेले तर शिवसेनेचे जावेद शेख, नंदू सांगळे, रावसाहेब राजोळे यांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे. त्यातच रासाका मुळे सध्या राष्ट्रवादीला ‘अच्छे दिन’ आले आहे.

आमदारकी, बाजार समिती आणि सर्वाधिक जि.प. सदस्य ही राष्ट्रवादीची जमेची बाजू आहे. तर पाच वर्ष पं.स. त एकहाती सत्ता ही शिवसेनेसाठी आशादायक बाब आहे. त्यामुळे या सत्तेचा कोण कसा उपयोग करून घेणार. तसेच कोणत्या गटात कोण कुणाकडून उमेद्वारी करणार यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. एकूणच जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून बाजार समितीच्या निवडणुकीने अवघा तालुका ढवळून निघणार असून त्यानंतर जि.प. व पं.स., जिल्हा बँक आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा माहोल रंगणार आहे. साहजिकच पुढील वर्ष हे निवडणुकीचे वर्ष ठरण्याची शक्यता असून वर्षभर आरोप-प्रत्यारोप, शह-काटशहचा धुरळा जोरात उडणार आहे.

बाजार समितीबरोबरच जि.प. व पं.स. च्या निवडणुका या राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर, शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम तर भाजपचे यतीन कदम यांचेसाठी प्रतिष्ठेच्या असून ही निवडणूक आगामी विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिली जात असल्याने येथे प्रत्येकाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. मात्र त्यासाठी हे सारे नेते जि.प. व पं.स. च्या कोणत्या गटात व गणात कोणते आरक्षण निघते याची वाट पहात असून आरक्षणानंतरच उमेदवार निश्चितीला वेग येणार आहे. निफाड तालुका हा चार भागात विभागला गेला आहे.

गोदाकाठ, पूर्व, पश्चिम पट्टा तर उत्तर बाजू. त्यामुळे या प्रत्येक भागात कुणाचे ना कुणाचे वर्चस्व राहिले आहे. गोदाकाठमध्ये उसाचे क्षेत्र सर्वाधिक तर उत्तरेकडे टोमॅटो, मिरची व भाजीपाला पिकाला शेतकर्‍यांची पसंती तर पश्चिमेकडे सर्वाधिक क्षेत्रावर द्राक्षबागा तर पूर्व भागात कांदा, मका, सोयाबीनसाठी प्रसिद्ध. त्यामुळे प्रत्येक भागातील शेतकर्‍यांच्या गरजा देखील वेगळ्या आहेत. त्यामुळे प्रचार करतांना नेत्यांना त्या-त्या भागातील समस्यांवर जोर द्यावा लागेल. साहजिकच जि.प., पं.स. ची निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसे राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com