'शिक्षक मित्र गल्ली मित्र' जिल्हा परिषदेचा उपक्रम
नाशिक

'शिक्षक मित्र गल्ली मित्र' जिल्हा परिषदेचा उपक्रम

ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्या पर्यंत शिक्षण मिळण्यासाठी संकल्पना

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

ग्रामसेवक, सरपंच यांच्याशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी थेट संवाद साधल्यानंतर आता शिक्षण विभागासह शिक्षक व केंद्र प्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधला. यात प्रामुख्याने ऑनलाईन शिक्षण देतांना शिक्षकांना येणाऱ्या अडी-अडचणी बनसोड यांनी जाणून घेतल्या. तसेच ' शिक्षक मित्र गल्ली मित्र ' या संकल्पना मांडत ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यापंर्यंत शिक्षण पोहचविण्याचे आवाहनही त्यांनी शिक्षकांना केले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा कधी सुरू होणार याबाबत अद्यापही शासनाकडून कोणतेही निर्देश आले नाहीत. असे असले तरी, जिल्हा परिषदेच्या जिल्हयातील ९३१ शाळांमध्ये ऑनलाइन पध्दतीने ज्ञानदानाचे काम सुरू करण्यात आले आहे.मात्र, विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण मिळणे गरजेचे असल्याने त्यादृष्टीने शाळा सुरू करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांनी पुढाकार घेत, बुधवारी (दि.१) ग्रामीण भागातील आॅनलाईन शिक्षण देत असलेल्या शिक्षकांशी संवाद साधला. व्हीसीव्दारे साधलेल्या या संवादात अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, शिक्षण सभापती सुरेखा दराडे, शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांसह १५ केंद्रप्रमुख सहभागी झाले होते.

सर्व विद्यार्थ्यांपर्यंत उपलब्ध झालेले शैक्षणिक साहित्य पोहोचवण्याचे प्रयत्न शिक्षण विभागाकडून सुरू आहे. ग्रामीण भागात ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाइलची व्यवस्था नाही, अशा विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचावे यासाठी 'शिक्षक मित्र गल्ली मित्र' संकल्पना राबविण्याच्या सूचना बनसोड यांनी केल्या. यात जे विद्यार्थी मोबाईलव्दारे शिक्षण घेत आहे.

मात्र, ज्यांना हे शक्य नाही अशा विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना जावे. गल्लीत असे विद्यार्थी असतील तर, त्यांना अभ्यासक्रम सांगावा, गृहपाठ असल्यास त्यांची देवाण-घेवाण करावी, मोबाईलवर शिक्षक शिकवत असताना शक्य झाल्यास, मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांसही सहभागी करून घ्यावेत.

ज्या शिक्षकांनाही शक्य आहे त्यांनीही शिक्षण न मिळालेल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करून त्यालाही शिक्षणाचा लाभ द्यावा, दुर्गम भागातील विद्यार्थ्यापर्यत शिक्षण पोहतेल अशी व्यवस्था करा अशा सूचना बनसोड यांनी यावेळी दिल्या. आॅनलाईन शिक्षणात वेगवेगळे प्रयोग राबविणाऱ्या शिक्षकांशीही बनसोड यांनी संवाद साधत, वेगेवेगळे प्रयोग करणाऱ्या शिक्षकांनी आप-आपसात या प्रयोगांशी देवाण-घेवाण करावी,असे आवाहन बनसोड यांनी केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com