नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

करोना महामारीमुळे सरकारचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे. याचा फटका शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निधीवर झाला आहे.परिणामी जिल्हा परिषद सदस्यांना सलग दोन वर्षे स्वनिधीपासून वंचित रहावे लागणार आहे.

यावर्षी जिल्हा परिषदेला केवळ १८ कोटी स्वनिधी जमा झाला असून त्यातील जवळपास सर्वच रक्कम इतर प्राधान्यांच्या कामांसाठी राखीव ठेवावी लागणार असल्याने सदस्यांना गटातील हक्कांच्या कामांसाठी सेसपासून वंचित रहावे लागणार असल्याचे चित्र आहे.

करोना जागतिक महामारीमुळे राज्य शासनाच्या उत्पन्नात घट झाली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या करांमध्येही घट झाली.त्यातच सरकारने डिसेंबरपर्यंत निधी वितरित न केल्यामुळे ठेवींवरील व्याजही जिल्हा परिषदेस मिळू शकलेले नाही. यामुळे जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात जवळपास ५७ टक्के घट झाली आहे. मागील वर्षी म्हणजे २०१९-२०१० या वर्षात जिल्हा परिषदेला ४२ कोटींचा स्वनिधी जमा झाला होता. यावर्षी त्यात घट होऊन केवळ १८ कोटी रुपये प्राप्त होणार आहेत.

त्यातील ५० टक्के रक्कम पाणी पुरवठा, समाजकल्याण, शाळा दुरुस्ती, दिव्यांग यासाठी खर्च करावा लागणार आहे.अत्यावश्यक योजनांसाठी खर्च होणार असून सहा कोटी रुपये नवीन प्रशासकीय इमारत आणि इतर रक्कम प्रशासकीय बाबींसाठी वापरावी लागणार आहे. पुढील वर्षी जिल्हा परिषदेच्या निवडणुका असताना सदस्य यंदा स्वनिधीपासून वंचित राहणार असल्याने त्यांच्यात मोठी नाराजी आहे.

राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून ग्रामीण भागात रस्ते, शाळा बांधकाम, आरोग्य केंद्र उभारणे, अंगणवाडी बांधकाम, घरकूल, स्वच्छता आदी कामे केली जातात. या पलिकडे नियाेजनात समावेश नसलेल्या व मतदारांसाठी महत्वाची असलेली कामे सदस्यांकडून स्वनिधीमधून केली जातात. यासाठी इतर विभागांच्या योजन कमी करून अधिकाधिक निधी शिल्लक ठेवला जातो. यावर्षी जिल्हा परिषद उत्पन्नात घट झाल्यामुळे सदस्यांना अगदी तोकडा निधी मिळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे करोना संकटाचा मोठा फटका जिल्हा परिेषद सदस्यांना बसणार आहे.