
वावी | प्रतिनिधी
तालुक्यातील घोटेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य गोरक्षनाथ बाबाजी घोटेकर यांनी ग्रामपंचायत मालकीची मिळकत स्वतःच्या नावे असल्याचा बनावट हस्तलिखित उतारा बनवून लिव्ह अँड लायसन्सी करारनामा करत ही जागा एका मेडिकलला भाड्याने दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी संबंधित सदस्यावर बनावट दस्त बनवल्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असीमा मित्तल यांनी काढले आहेत.या संदर्भात गटविकास अधिकार्यांनी ग्रामसेवक संदीप वाघचौरे यांना फौजदारी करून त्याचा अहवाल तातडीने सादर करावा, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे आदेशित केले आहे.
घोटेवाडी ग्रामपंचायतची मिळकत क्रमांक १८२ /१५/२ ही आपल्या नावे असल्याचा नमुना ८ चा बनावट उतारा गोरक्षनाथ बाबाजी घोटेकर यांनी बनवला. हा उतारा वापरुन त्यांनी शंभू मेडिकल यांच्याशी दुय्यम निबंधक कार्यालय सिन्नर येथे २८/७/२०२१ रोजी लिव्ह अँड लायसन्सी करारनामा केला. सदर करारनामा वापरुन शंभू मेडिकल यांना ही जागा त्यांनी २ हजार रुपये प्रति महिना याप्रमाणे भाडेतत्त्वावर वापरावयास दिली.
ही बाब तक्रारकर्ते प्रवीण किसन घेगडमल आणि माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र सुखदेव घोटेकर यांनी माहिती अधिकारात उजेडात आणली. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असीमा मित्तल यांच्याकडे कागदपत्रांच्या पुराव्यानिशी तक्रार केली होती. यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश त्यांनी गटविकास अधिकार्यांना काढले होते.
सिन्नर पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांनी चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर केला. या अहवालात संबंधित जागेच्या हस्तलिखित उतार्यावर आपले हस्ताक्षर आणि स्वाक्षरी नसल्याचा लेखी जबाब ग्रामसेवक संदीप वाकचौरे यांनी दिला. याशिवाय संबंधित मिळकतीचा संगणकीकृत उताराही चौकशी अधिकार्यांनी पडताळून पाहिला.
त्यानंतर हा उतारा बनावट असल्याचा निष्कर्ष निघाल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य गोरक्षनाथ बाबाजी घोटेकर यांच्यावर बनावट दस्त बनवल्या प्रकरणी फौजदारी कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकार्यांना काढले. त्यांनी या संदर्भात ग्रामसेवक संदीप वाकचौरे यांना आदेशित केले आहे.