जिल्हा परिषद
जिल्हा परिषद
नाशिक

घरात जुना मोबाईल पडून आहे? विद्यार्थ्यांसाठी दान करा

नाशिक जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम

Gokul Pawar

Gokul Pawar

ऑनलाईन शिक्षणासाठी “डोनेट अ डिव्हाईस” चळवळ

नाशिक । Nashik

करोनाच्या काळात विद्यार्थ्यांना शिक्षण गरजेच असल्याने अनेक ठिकाणी ऑनलाईनव्दारे शिक्षण देण्यात येत आहे. मात्र , जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी साधन उपलब्ध नसल्याने जिल्हा परिषदेने एक अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ‘डोनेट अ डिव्हाईस’ चळवळ सुरु करत घरी पडून असलेले जुने अँड्रॉईड मोबाईल दान करण्याचे आवाहन केले आहे.

जिल्हा परिषदेच्यावतीने याचा औपचारिक शुभारंभ मंगळवारी (दि.१५) करण्यात आला. त्याचबरोबर तंत्रसेतु नाशिक हेल्पलाईन व विदयावाहिनी रेडिओ या उपक्रमांचाही शुभारंभ करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात फिजिकल डिस्टन्सचे पालन करुन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, आरोग्य व शिक्षण सभापती सुरेखा दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड,महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर आदिंच्या उपस्थितीत तीन उपक्रमांना सुरुवात करण्यात आली. शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनीही ऑनलाईनव्दारे कार्यक्रमात सहभाग घेतला.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनादेखील करोनाच्या या संकटकाळात दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी जिल्हा परिषदेने हा उपक्रम सुरु केला असल्याचे सांगत समाजातील सर्व घटकांनी डोनेट अ डिव्हाईस उपक्रमांतर्गत आपल्याकडील जुने मोबाईल, लॅपटॉप, संगणक, स्माट टिव्ही दान करण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांनीही यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. ज्या ठिकाणी मोबाईल रेंज उपलब्ध नाही अशा ठिकाणी शिक्षकांमार्फत गटा-गटाने विद्याथ्यांना शिक्षण देण्याच्या सुचना त्यांनी यावेळी केल्या. डोनेट अ डिव्हाईस उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण सभापती सुरेखा दराडे यांनी दोन नवीन मोबाईल, ग्लोबल इंटरनॅशनल स्कुलचे संचालक ज्ञानोबा केंद्रे यांनी एक नवीन मोबाईल, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव यांनीही एक मोबाईल कार्यक्रमातच शासकीय कन्या शाळेतील विद्यार्थीनींना उपलब्ध करुन दिले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांनीही नवीन मोबाईल देणार असल्याचे सांगितले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ग्रामीण भागामध्ये स्मार्टफोन व इतर सामुग्रीअभावी विद्यार्थ्याना शिक्षण घेणे शक्य होत नाही. जिल्हयातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याच्या उददेशाने जिल्हा परिषदेने डोनेट अ डिव्हाईस चळवळ सुरु केली असून याअतंर्गत विविध स्वयंसेवी संस्था तसंच लोकांना आवाहन करून आपले जुने मोबाईल व अन्य साहित्य दान करण्याचे आवाहन केले.

आरोग्य व शिक्षण सभापती सुरेखा दराडे यांनी ज्ञानासारख्या पवित्र कार्यात दानशूरांनी सुस्थितीतील उपकरणे दान करावी व ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा,असे आवाहन केले. प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी याबाबतच्या सुचना सर्व तालुक्यांना दिल्या असून ‘डोनेट अ डिव्हाईस’ अंतर्गत मदतीसाठी विविध संस्था, संघटना यांच्याशी संपर्क साधण्यात येत असल्याची माहिती दिली. कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) आनंद पिंगळे, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी प्रमोद पाटील यांच्यासह ऑनलाईनव्दारे विविध मान्यवर उपस्थित होते.

ग्रामीण भागासाठी अभिनव उपक्रम –बनसोड

सध्या करोनामुळे जगभर शिक्षणाचे व्हर्च्युअल क्लासेस सुरे झाले आहेत. वर्गातील शाळा घरांमध्ये भरू लागली आहे. शहरात जवळपास सर्वांकडे स्मार्टफोन असल्यामुळे त्यांना ऑनलाईन शिक्षण शक्य आहे. मात्र ग्रामीण भागातील चित्र वेगळे आहे. नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागात २ लक्ष ७० हजार ७०३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी ९९८५३ विद्यार्थ्याकडे ऍन्ड्राईड मोबाईल उपलब्ध आहे. जवळपास ६० टक्के विद्यार्थाकडे ऑनलाईन शिक्षणासाठीची साधन उपलबध नाहीत. त्यामुळे अशाप्रकारचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून ग्रामीण भागातील मुलांना ऑनलाईन शिक्षणाच्या कक्षेत आणण्यासाठी मदतीचा हात आवश्यक आहे. ज्याठिकाणी तांत्रिक अडचणी आहेत तेथे गल्लीमित्र, विषयमित्र ही संकल्पना राबवून चार ते पाच विद्यार्थ्यांच्या गटाला शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

असे आहेत शैक्षणिक उपक्रम

तंत्रसेतू- नाशिक हेल्पलाईन

नाशिक शिक्षण हेल्पलाईन ही एक टेलिग्रॅम चॅनलचा वापर करुन शैक्षणिक संवाद साधण्यासाठी तयार करण्यात आले आहे. टेलिग्रॅम ॲपव्दारे तंत्रसेतू- नाशिक हेल्पलाईन हे नाव टाकुन यामध्ये सहभागी होता येईल. यामध्ये सहभागासाठी मर्यादा नसल्याने विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना यात सहभागी होता येणार आहे. शालेय अभ्यासक्रम, विविध व्हिडीओ याव्दारे दररोज विद्यार्थ्याना पाठविण्यात येतील तसेच विविध प्रश्नांची उत्तरे देण्याची सोयही यात करण्यात आली आहे.

विद्यावाहिनी रेडिओ

ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन उपलब्ध नाहीत. रेंजची समस्या आहे. त्यांच्यासाठी नाशिक आकाशवाणीव्दारे शैक्षणिक कार्यक्रम प्रसारीत करण्यात येणार आहे. आकाशवाणी नाशिकच्या माध्यमातून जिल्हयातील सर्व विद्यार्थ्यांना दररोज दोन तास याप्रमाणे सकाळी व संध्याकाळी कार्यक्रमोचे प्रसारण होणार आहे. यासाठी शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत सामाजिक संस्थांची मदत घेण्यात आली आहे.

‘डोनेट अ डिव्हाईस’

ग्रामीण भागातील गरीब, गरजु विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळणेसाठी सुस्थितीत असणारे जुने मोबाईल, लॅपटॉप, संगणक, स्माट टिव्ही दान करावयाचे आहे. सदरचे साहित्य ग्रामीण भागातील गरजु विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com