जि.प.सेवकांच्या बदल्या पुन्हा रद्द?
नाशिक

जि.प.सेवकांच्या बदल्या पुन्हा रद्द?

प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

Vijay Gite

Vijay Gite

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषद सेवकांच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात रद्द करण्यात आलेल्या बदल्या, स्थानिक पातळीवर पुन्हा रद्द होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात वाढता करोनाचा प्रादुर्भाव तसेच सेवक बदल्यांमुळे आदिवासी व बिगर आदिवासी भागाचा समतोल राहणार नसल्याने बदल्या नकोच, अशी भूमिका अनेकांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे प्रशासनाकडून सेवक बदल्या रद्द करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

याबाबत प्रशासन दोन दिवसात काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस बदली प्रक्रिया राबविण्यात येते.यावर्षी मात्र करोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य शासनाने बदली, भरती प्रक्रीया रद्द केली होती. मात्र, सरकारने जि.प.सेवकांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले.

३१ जुलै अखेर बदली प्रक्रिया पार पाडावी,असे आदेश ग्रामविकास विभागाने दिले. त्यानुसार जि.प. प्रशासनाने तयारी करत सेवा ज्येष्ठता यादी तयार करत २३ जुलै रोजी प्रसिध्द करत आॅनलाईन बदली प्रक्रीया राबविण्याची तयारी केली. यातच या बदल्यांना १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ आली.

प्रशासन तयारीत असताना बदल्या करू नये,अशी मागणी होऊ लागली. आॅगस्ट महिना उजाडला असून अनेक सेवकांचे यात नुकसान होणार असल्याच्या भावना कर्मचारी संघटनांनी व्यक्त केल्या आहेत.

या बदली प्रक्रीयेत प्रामुख्याने बिगर आदिवासी भागातील रिक्त जागांची टक्केवारी ६० टक्यांवर जाणार आहे.

आधीच या भागात रिक्त पदे मोठी आहेत. यात बदली झाल्यानंतर आणखी रिक्त पदाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे करोना संकटात रिक्त जागा नको, असे सांगत बदल्या नको असा सूर आळवण्यात आला.

याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सोमवारी विभागप्रमुखांची बैठक घेऊन, त्यांची मते विचारत घेतली.

या बैठकीत अनेक अधिकाऱ्यांनी बदल्या नको, अशी भूमिका मांडल्याचे कळते. याशिवाय कर्मचारी संघटनांनी करोनाच्या काळात बदल्या नको, अशी भूमिका मांडल्याचे सांगण्यात आले.

प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

राज्यातील नांदेड व जालना जिल्हा परिषद प्रशासनाने करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सेवक बदली प्रक्रीया ही रद्द करण्याचा निर्णय घेतला. याच धर्तीवर जि.प. प्रशासनाने बदल्या रद्द कराव्यात,अशी मागणी जोर धरू लागली आहे. यावर आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com