आघाडीची ही तर नुसती झलक!

आघाडीची ही तर नुसती झलक!
महाविकास आघाडी

नाशिक | विजय गिते | Nashik

महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेची (Zilla Parishad) सत्ता हस्तगत करत जिल्हा परिषद भाजपामुक्त केली खरी. मात्र,नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या रिक्त जागेसाठी झालेल्या निवडणुकीत या आघाडीतील घटक पक्ष असणार्‍या शिवसेना (ShivSena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) यांच्यामधील अंतर्गत कुरघोडी पुन्हा एकदा जिल्ह्याने अनुभवली. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्तेसाठी सूत जुळले असले तरी मन मात्र अजूनही जुळलेले नसल्याचेच यावरून स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीतील हा ट्रेलर असून अजून पिक्चर बाकी आहे असेच येथे अधोरेखित झाले आहे.

स्थायी समितीच्या सदस्य पदाच्या एका जागेसाठी शिवसेना व राष्ट्रवादीने ठरविले असते तर ही जागा महाविकास आघाडीचे सभागृहातील संख्याबळ पाहता नक्कीच खेचून आणने तसे अवघड नव्हते. मात्र,येथेही भविष्यातील राजकीय समीकरण, स्थानिक राजकारण, गट-तट, जुने उट्टे आडवे आले. शिवसेनेने राष्ट्रवादीला ऐनवेळी दगा दिला. तसे पाहता विद्यमान सभागृहाचा (सदस्यांचा) अवघा पाच ते सहा महिन्यांचाच कार्यकाल राहिला असून आत्तापासूनच ‘काउंटडाऊन’ सुरू झालेले आहे.

तरी देखील अवघ्या सहा महिन्यांकरिता एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत इतके टोकाचे राजकारण होणार असेल तर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका महाविकास आघाडी गळ्यात गळा घालून एकत्र लढणार तरी कशा? अशा लहान सहान निवडणुकीतच मन जुळणार नसेल तर पुढे विधानसभा निवडणुकीत काय होणार असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासून छूटूपुटीच्या लढाया सुरू असल्या तरी गुण्यागोविंदाने सत्तेचा गाडा हळूहळू पुढे सरकत आहे. तोच आदर्श समोर ठेवत नाशिक जिल्हा (Nashik District) परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता आली. तीचे फळेही सर्वजण चाखत आहे.

आता पुढील वर्षी म्हणजेच साधारण फेब्रुवारीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका (Panchayat Samiti elections) होणार आहेत. मात्र,तत्पूर्वी निवडणुकीच्या पूर्वीचे राजकीय धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी मागील आठवड्यात निवडणूक झाली. कदम हे भाजपच्या कोट्यातील असल्यामुळे भाजपने पहिल्यापासून या जागेसाठी आपला दावा सांगितला.

दुसरीकडे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने देखील आपल्याकडे बहुमत असल्याने या जागेसाठी आग्रह सुरू केला. तसे पाहता महाविकास आघाडीकडे बहुमत असल्याने अगदी सहज आपसातील संमतीने दोघांपैकी एका पक्षाचा उमेदवार देऊन ही जागा आघाडीकडे राखता आली असती आणि मतदानही झाले असते तर भाजपाकडे माघार घेण्याशिवाय पर्याय नव्हता.

त्यामुळे आघाडीचा अजून एक सदस्य स्थायीवर गेला असता. मात्र, तसे न होता शिवसेना व राष्ट्रवादीतील निफाड तालुक्याचे स्थानिक राजकारण येथे आड आले. याचा फटका राष्ट्रवादीचे सिद्धार्थ वनारसे आणि शिवसेनेचे दीपक शिरसाट यांना बसला. तसे पाहता वनारसे आणि शिरसाट यांच्यासह अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, भाजपचे ज्ञानेश्वर उर्फ डी.के. जगताप हे निफाड तालुक्याचेच भूमिपुत्र.

त्यामुळेच निफाड विधानसभा निवडणुकीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील मागील राजकारण येथे उफाळून आले. याशिवाय पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीचे डावपेचही येथे आडवे आले.

शिवसेनेने वनारसे यांच्या माध्यमातून राजकीय अडवणूक करत राष्ट्रवादीला येथे रोखण्याचा डाव साधला असेच म्हणावे लागेल. तसे पाहता वनारसे यांनी अगोदरपासूनच राजकीय फिल्डिंग लावल्याने त्यांचे पारडे जड होते.

मात्र, वनारसे यांना स्वकीयांनी पाहिजे तशी साथ दिली नाही. याशिवाय अध्यक्ष क्षीरसागर यांनीही या निवडणुकीत पाहिजे तसा रस घेतला नाही. कारण शिरसाट हे देखील प्रयत्न केला असता तर स्थायी समितीवर जाऊ शकले असते. मात्र, येथेही ‘कानामागून आला अन तिखट झाला’ असे व्हायला नको, या भूमिकेतून शिरसाट यांना पाहिजे तशी मदत झाली नाही.

परिणामी महाविकास आघाडीकडे बहुमत असून देखील राष्ट्रवादी आणि शिवसेनेला आपल्याकडे ही जागा खेचून आणता आली नाही ही आघाडीच्या दृष्टीने नामुष्की आहे. इकडे भाजपाकडे दोन अंकी सदस्यांचे बलाबल नसताना देखील आघाडीतील अंतर्गत राजकारणाचा भाजपला पर्यायाने जगताप यांना मोठा फायदा झाला.

निवडणुका कशा लढणार ?

एका जागेसाठी एवढे मोठे राजकारण रंगलेले असताना आणि अवघ्या पाच -सहा महिन्यांवर आलेल्या जिल्हा परिषद निवडणुका एकत्र येण्याबाबत एकीकडे महाविकास आघाडीत चर्चा सुरू झाली असताना या निवडणुकांमध्ये मात्र अंतर्गत किती कुरबुरी आहेत, हे अधोरेखित झाले. रिक्त जागेसाठी दोन पक्षांमध्ये आघाड्या आणि सहमती देखील होऊ शकत नाही. तेथे एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा लढणार असा सवाल मात्र यातून उपस्थित केला जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com