...म्हणून जि.प. स्थायी बैठक तहकूब करण्याची नामुष्की ओढवली
नाशिक

...म्हणून जि.प. स्थायी बैठक तहकूब करण्याची नामुष्की ओढवली

Vijay Gite

Vijay Gite

नाशिक । प्रतिनिधी

स्थायी समितीची बैठक प्रत्यक्ष, सभागृहात घेण्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली.

बैठकीत सहभागी झालेल्या शंकर धनवटे व भास्कर गावित या सदस्यांनीही आॅनलाईन बैठक घेऊ नये असा पवित्रा घेतला. त्यामुळे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांना स्थायीची बैठक तहकूब करावी लागली.

स्थायी समितीची आॅनलाईन सभा शुक्रवारी (दि.३१) अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली बोलाविण्यात आली होती. मात्र, बैठकीस धनवटे, गावित वगळता इतर सदस्य सहभागी झाले नाही.

डॉ. आत्माराम कुंभार्डे, यतिन कदम, सविता पवार, महेंद्र काले, किरण थोरे या सदस्यांनी सभा प्रत्यक्षात सभागृहात घ्यावी,अशी मागणी करत, सभेत सहभागी न होण्याचा आक्रमक पवित्रा घेतला.अध्यक्ष क्षीरसागर यांनी सदस्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.परंतू , सदस्य आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

सदस्यांच्या बहिष्कारानंतरही सुरू झालेल्या बैठकीत सदस्य सहभागी होणार नसतील तर सभा घेऊन काय उपयोग असा मुद्दा सभापती संजय बनकर, सभापती अश्विनी आहेर यांनी उपस्थित केला. धनवटे यांनी आॅनलाईन सभा कशासाठी ? असा प्रश्न उपस्थित करत, या सभेत मुद्दे मांडता येत नसल्याचे सांगितले.

आॅनलाईन सभेत मोबाईल रेंजचा अडथळा येतो.ग्रामीण भागात सदस्यांना बोलता येत नाही .त्यामुळे आॅनलाईन सभेतून काहीही साध्य होत नसल्याचे गावित यांनी सांगितले. करोना महासंकट गंभीर असून यावर चर्चा होणे गरजेचे असल्याने सभा सभागृहात घ्यावी,अशी मागणी धनवटे यांनी करत आॅनलाईन सभा नको अशी भूमिका मांडली.

त्यास गावित यांनी अनुमोदन देत सभा नकोच असे सांगितले. त्यावर अध्यक्ष क्षीरसागर यांनी सभा तहकूब केली. सभेची पुढील तारीख सदस्यांनी कळवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, सभापती सुरेखा दराडे, आश्विनी आहेर, सुशिला मेंगाळ यांसह अधिकारी सहभागी झाले होते.

विरोधामुळे सभा तहकूब

स्थायी समिती सदस्यांचा आॅनलाईन सभा घेण्यास विरोध होता. अनेक सदस्यांनी आॅनलाईन सभा न घेता सभागृहात सभा घेण्याची मागणी बैठकीत केली. त्यामुळे ही सभा तहकूब केली आहे. सदस्यांच्या मागणीनुसार पुढील सभा सभागृहात आयोजीत केली जाईल.

बाळासाहेब क्षीरसागर (अध्यक्ष, जि.प.)

Deshdoot
www.deshdoot.com