
नाशिक । प्रतिनिधी Nashik
गेल्या महिन्यात येवला येथे खून झालेल्या निर्वासित अफगाण सुफी धर्मगुरु जरीफ बाबा (Zarif Baba, an Afghan Sufi religious leader) यांच्या खूनप्रकरणातील आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षकांच्या अधिपत्याखाली विशेष चौकशी समिती (एसआयटी) स्थापन करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे. तर, खुनाच्या गुन्ह्याचा तपास येवल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे करीत आहेत.
दरम्यान, जरीफ बाबा यांचा मृतदेह दूतावासामार्फत अफगाणिस्तानला रवाना करण्यात आला आहे. ख्वाजा सय्यद जरीफ अहमद चिश्ती उर्फ जरीफ बाबा (32) असे पूर्ण नाव असलेल्या निर्वासित अफगाण सुफी धर्मगुरुंचा गेल्या 5 जुलै रोजी रात्री येवला तालुक्यातील चिंचोडी औद्योगिक वसाहतीमध्ये गोळी झाडून खून करण्यात आला होता.
भारताचे नागरिकत्व नसल्याने बाबाने सदरची मालमत्ता त्यांच्या विश्वासातील माणसांच्या नावावर खरेदी केली होती. यातून त्यांचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे. दरम्यान, जरीफ बाबांच्या कोट्यवधीं रुपयांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाडचे पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे यांच्या अधिपत्याखाली एक विशेष चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे.
या समितीमार्फत आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. मयत जरीफ बाबा यांचा खून झाल्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह शवागारात ठेवण्यात आलेला होता. अफगाणीस्तानमध्ये दफनविधी करायचा असल्याने त्यासंदर्भातील नातलगांना व्हिसा मिळविण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे गेल्या आठवड्यात मृतदेह मुंबईकडे रवाना करून दुतावासामार्फत अफगाणिस्तानाला पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.