युवा मित्र- राज्य शासनामध्ये सामंजस्य करार

नांदूर मध्यमेश्र्वर एक्सप्रेस कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये पाण्याचा कार्यक्षमतेने वापर होणार
युवा मित्र- राज्य शासनामध्ये सामंजस्य करार

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

राज्य शासनाचा जलसंपदा विभाग आणि युवा मित्र यांच्यामध्ये नांदूर मध्यमेश्र्वर एक्सप्रेस कालवा लाभ क्षेत्र विकासासाठी सामंजस्य करार झाला असून नांदूर मध्यमेश्र्वर एक्सप्रेस कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये पाण्याचा कार्यक्षमतेने वापर करत उत्पादकता वाढविण्याबरोबरच एकात्मिक शेतीविषयक गुंतवणूक आणि बाजारपेठेशी जोडणी करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम त्यातून साकारणार आहे.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सचिव प्रवीण परदेशी, राजेंद्र पवार, सहसचिव डॉ. संजय बेलसरे, जे. वी. आर. मूर्ती, युवा मित्रचे कार्यकारी संचालक सुनील पोटे, ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात नुकत्याच सांमजस्य करारावर सह्या करण्यात आल्या. सततचा दुष्काळ व पाण्याचा तुटवडा असणाऱ्या औरंगाबाद जिल्हातील वैजापूर, गंगापूर व अहमदनगर जिल्हातील कोपरगाव तालुक्यामध्ये शेतीच्या सिंचनाची गरज भागविण्यासाठी नांदूर मध्यमेश्र्वर धरणामधून 2004 साली 125 कि.मी.चे पाटाचे जाळे तयार करण्यात आले आहे.

जलसंपदा विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनातून व युवा मित्र प्रत्यक्ष अंमलबजावणी करत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी व समन्यायी पाणी वाटपासाठी 123 पाणी वापर संस्थांची क्षमता बांधणी करणे, खालवत चाललेली भूजल पातळी आणि अमर्याद वापर यावर उपाय म्हणून भूजल विकास व व्यवस्थापन करणे, धरण लाभ क्षेत्रातील 5000 एकर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणणे, उत्पादित शेतमालासाठी मूल्यवर्धित साखळी निर्माण करण्यासाठी 10 शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करणे इत्यादी उद्देश या माध्यमातून साध्य केले जाणार आहेत.

औरंगाबाद व अहमदनगर जिल्हातील 3 तालुके व 104 गावांमधील 55 हजार कुटुंबाना या उपक्रमाचा प्रत्यक्ष फायदा होणार असून सुमारे 1.08 लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. प्रायोगिक तत्वावर राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पात शासकीय यंत्रणा, लाभक्षेत्रातील शेतकरी, सामाजिक संस्था, कॉर्पोरेट-देणगीदार संस्था यांचाही सहभाग असणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com