व्यसनमुक्तीसाठी युवकांचा पुढाकार; गावठी दारू हातभट्टया उद्ध्वस्त

व्यसनमुक्तीसाठी युवकांचा पुढाकार; गावठी दारू हातभट्टया उद्ध्वस्त

पुनदखोरे । वार्ताहर

भारतासह सर्व जगात करोनाचा विस्फोट होऊन लाखो लोक रोज बाधित होत आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशा परिस्थितीत शासना बरोबरच आपलेही काही कर्तव्य आहे, या भावनेतून आदिवासी समाजातील काही तरुण समाजबांधवांचा रोष पत्करून व्यसनमुक्तीसाठी परिसरातील गावठी दारू तयार करणार्‍या हात भट्ट्या उद्ध्वस्त करत आहे. सर्वांनाच प्रेरणादायी ठरावी, अशी ही घटना आहे.

कळवण तालुक्यातील मोकभणगी येथील करोना विषाणूच्या संसर्गाने नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजवला आहे. यावर मात करण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ सारख्या मोहिमा राबविल्या जात आहे. शासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थापना काही अटी शर्तींच्या अधीन राहून चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्या व्यतिरिक्त इतर व्यवसाय संपूर्ण बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.

वाईन शॉप व बियरबार पूर्णतः बंद करण्यात आल्याने आपल्या दारूची तहान भागवण्यासाठी तळीरामांनी आपला मोर्चा आदिवासी पाड्यांवर वळवला आहे. त्यामुळे गावागावात गावठी दारु घेण्यासाठी आदिवासी वस्तीवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्याच कारणाने ग्रामीण भागात संसर्ग वाढला आहे.

कळवण तालुक्यातील मोकभणगी येथेही गावठी दारू घेण्यासाठी आदिवासी वस्तीवर गर्दी होत असल्याने गावचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यावर गावातीलच काही आदिवासी तरुणांनी एकत्र येऊन जंगलात, दर्‍याखोर्‍यात असणार्‍या गावठी दारू तयार करणार्‍या हातभट्टी बंद करण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी सर्व समाज बांधवांना याबाबत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने आक्रमक होऊन हातभट्ट्या तोडण्यास सुरुवात केली आहे. त्यांना गावातीलच काही गुंड प्रवृत्तीच्या नागरिकांकडून विरोध होत आहे. मात्र संपूर्ण दारुबंदी होऊन गाव सुरक्षित होत नाही तोपर्यंत हे अभियान चालूच ठेवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

या अभियानात शरद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अजय पवार, रविंद्र माळी, महेंद्र सोनवणे, भुराजी पवार, विकेश माळी, अनिल गायकवाड, राकेश मोरे, विशाल माळी, रवींद्र बोरसे, ज्ञानेश्वर खैरणार, विजय सोनवणे, लहानू बोरसे, भूषण बोरसे, पोपट पवार, रवींद्र पवार, रोशन बोरसे आदी तरुणांचा ग्रुप सक्रिय असून त्यांचे सर्व थरातून कौतुक होत आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन इतरही गावात स्थानिक युवकांनी अशी मोहीम राबवावी. प्रशासनानेही याची दखल घेऊन ह्या तरुणांना पाठबळ द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

करोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केला. मात्र आमच्या गावात गावठी दारू मुबलक मिळत असल्याने बाहेर गावातील व्यसनाधीन नागरिक दारू घेण्यासाठी गर्दी करत आहे. त्यामुळे आमच्या संपूर्ण गावचे आरोग्य धोक्यात आले होते. म्हणून आम्ही सर्व समविचारी आदिवासी तरुणांनी एकत्र येऊन दारुबंदी करण्याचा निर्णय घेतला.

शरद सोनवणे, मोकभणगी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com