तरुणाई व्यसनांच्या विळख्यात

आत्मविश्वास, दृढ निर्णयाने व्यसनमुक्ती शक्य
तरुणाई व्यसनांच्या विळख्यात
USER

नाशिक । अनिरुध्द जोशी

आजची तरुणाई सज्जनांची संगत घेण्याचे टाळून दुर्जनांच्या विळख्यात सापडू लागले आहेत. त्यामुळे ते व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन उद्ध्वस्त करीत आहेत. पौष्टिक पदार्थांऐवजी अंमली मद्याचा ग्लास हातात धरणारी आजची तरुण पिढी गांजा, चरस, गर्द पावडर, हेरॉईन, ब्राऊन शुगर आदी मादक पदार्थांच्या व्यसनात गुरफटत आहे.

घरचे सात्विक अन्न सेवन करायचे सोडून जिभेचे चोचले पुरविण्यासाठी हॉटेलमधील अन्न, चायनीज पदार्थ, जंक फूडसारखे पदार्थ खाऊन रोगराईला आमंत्रण देत आहेत. यामुळे तरुणांवर मानसिक, शारीरिक आजारपण येत आहे. तरुणांची वाटचाल व्यसनमुक्तीकडे होण्यासाठी पालकांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.

तरूणांचे प्रमाण गांजा, निकोटिन, व मद्य सेवनाचे प्रमाण जास्त वाढले आहे. शाळेतील विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे नशा करताना निदर्शनात येत आहेत. आजकाल काही कॅफेमध्ये युवतीदेखील सर्रास सिगारेट, हुक्का ओढतांना दिसतात.

कोणी तणावामुळे तर कोणी मौजमजेच्या नावाखाली व्यसनांच्या विळख्यात अडकत आहे. सध्याची तरूणाई व्यसनाधीनतेकडे वळत असून, ही गंभीर बाब आहे. पालकांनी आपल्या मुलांशी संवाद साधून यावर मार्ग काढणे आवश्यक आहे. व्यसन सोडण्यासाठी ‘कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा’ महत्वाची भूमिका बजावतो.

जर नातेवाईक व्यसनाशी झगडणार्‍या एखाद्या व्यक्तीवर टीका करत राहिले तर त्यांना दारू किंवा कोणत्याही प्रकारचा नशा सोडणे कठीण होईल. अशा परिस्थितीत कुटुंबाने त्यांचे समर्थन करण्याचा निर्णय घ्यावा आणि कमी लेखू नये. तसेच तरुणांनी सामर्थ्यवान मनाने आणि हेतूने नशा सोडण्यासाठी प्रयत्न करावेत.

आपण आपले मन तयार केले की आता आपण पुन्हा व्यसन करणार नाही, तर त्यासाठी प्रथम आपल्या मनातील आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे. कोणतीही नशा कमी करण्यासाठी आधी त्याचे प्रमाण कमी करा.

आपल्या सोबत लाइटर, माचीस, गुटखा, तंबाखू ठेवणे थांबवा. एक डायरी करा त्यात कोणाबरोबर आणि कधी नशा करायची हे लिहा. ते पुन्हा पुन्हा वाचा. आपल्याकडे एखाद्या विशिष्ट प्रसंगी किंवा एखादी विशिष्ट व्यक्ती जास्त नशा करत असल्यास, त्याकडे वेळोवेळी दुर्लक्ष करा.

तुम्हाला सिगारेट किंवा गुटखा हवाच असेल तर वेलची, लवंग, दालचिनी, ओवा अथवा बडीशेप खा. ई-सिगारेट (इलेक्ट्रॉनिक सिगारेट) किंवा हर्बल सिगारेटचा वापर सिगरेटचा पर्याय म्हणून होऊ शकतो. परंतु त्याचेदेखील प्रमाण कमीच असावे.

बरेच लोक हळूहळू व्यसन सोडण्याचा विचार करतात. परंतु तुम्हाला व्यसन सोडायचे असेल तर ताबडतोब व्यसन करणे सोडा. तसेच पालकांनी मुलांमधील मानसिक, शारीरिक आजार ओळखून मुलांना वेळ देणे गरजेचे आहे. मुलांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी माहिती डॉ. तुषार पवार यांनी दिली.

नवीन योजना बनवा

व्यसन सोडण्यापूर्वी आपण नशा का सुरू केली आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे. कारण आपणास त्याचे कारण माहीत असल्यास भविष्यातील रणनीती तयार करण्यात मदत होऊ शकते. कारण जाणून घेतल्यानंतर, एक नवीन योजना तयार करा की जर जुनी परिस्थिती परत आली तर त्या परिस्थितीचा सामना कसा करायचा?

आल्याचा नियमित वापर

आल्याचे छोटे-छोटे तुकडे करून त्यावर सैंधव मीठ घ्या. नंतर त्या तुकड्यांवर लिंबू पिळून उन्हात वाळवा. ज्यावेळेस व्यसन करावेसे वाटत असेल, त्यावेळी आल्याचे तुकडे तोंडात टाका. आले तोंडात विरघळत नाही. ते आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत तोंडात ठेवू शकता. यामुळे हळूहळू नशा करण्याची सवय जाईल.

व्यसन करणार्‍या तरूणांची संख्या गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. यात मुलीदेखील व्यसनांच्या आहारी मोठ्या प्रमाणात गेल्या आहेत. आत्मविश्वास व दृढ निर्णयामुळे तरुणाई व्यसनापासून दूर राहू शकते. याकरिता सत्याचा स्विकार करून खरे बोलण्याची प्रवृत्ती व आत्मविश्वास बाळगला तर तरुणाई व्यसनापासून नक्कीच दूर राहील.

डॉ. तुषार पवार, नाशिक.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com