युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन; 'या' उपोषणामुळे आले होते राज्यभर चर्चेत

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन; 'या' उपोषणामुळे आले होते राज्यभर चर्चेत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक ग्रामीणचे युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन झाले आहे. बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात त्यांनी आपले प्राण गमावले. मानस पगार हे सत्यजीत तांबे यांचे निकटवर्तीय मानले जात होते. तसेच युवक काँग्रेसमधील चर्चेतील चेहरा म्हणून त्यांची ओळख होती...

ते सोशल मीडियावर काँग्रेसची भूमिका अत्यंत आक्रमकपणे मांडत असत. त्यामुळे पक्षाने त्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्यावर युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती.

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घराबाहेर मानस पगार यांनी दीर्घकाळ केलेल्या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली होती. दानवेंनी शेतकऱ्यांसाठी वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेमुळे त्यांच्या घरासमोर उपोषण करण्यात आले होते. त्यात मानस पगार आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या सुटकेसाठी युवक काँग्रेसने सोशल मीडियावर मोहीम सुरू केली होती.

पगार यांच्या निधनानंतर युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ट्वीट करुन श्रद्धांजली अर्पण केली आहे. "माझा खंबीर पाठीराखा, सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे", असं तांबे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com