युवकास तरूणीसह चौघांकडून बेदम मारहाण

तरूणीवरच गुन्हा दाखल झाल्याने उलट सुलट चर्चा
युवकास तरूणीसह चौघांकडून बेदम मारहाण

नाशिक | Nashik

अनोळखी तरुणीकडे मेसेजव्दारे शरीरसुखाची मागणी करणार्‍या एका तरुणाला युवतीसह चार साथीदारांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. तर युवकाच्या मारहाण प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केल्याने शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहे.

याप्रकरणी वाल्मिक दादाराव अहिरे (25, रा. कोणार्क नगर, आडगाव) याने पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी 23 वर्षीय तरुणीसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. विकी रमेश पाथरे (वय 28), यश दिलीप ललवाणी (19) सनी रमेश पाथरे (28), चंदन सेवकराम नागराणी (27) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्मिक अहिरे याने दोन दिवसांपूर्वी ओळखीच्या मैत्रणिने दिलेल्या एका तरुणीचा मोबाईल क्रमांकावर मेसेज करत शरीरसुखाची मागणी केली. तरुणीने त्याच्याकडे 2 हजार रुपयांची मागणी केली. तडजोतीअंती दीड हजार रुपये देण्याचे ठरवून पंचवटी परिसरातील इंद्रकुंड येथे भेटण्याचे ठरले.

बुधवारी (दि. 16) दुपारी 3 वाजता संबंधित तरुणीने वाल्मिक यास कॉल करून इंद्रकुंड येथे बोलावले. तो इंद्रकुंड येथे आल्यावर संबंधित मुलीने सुरुवातीला त्याच्याकडून दीड हजार रुपये घेतले. त्यानंतर तिने कॉल करून चार साथीदारांना बोलावून घेतले. कार (एमएच 15 सीडी 2976) ने चौघेजण इंद्रकुंड परिसरात आले.

तुला शरीर संबंधासाठी मुलगी हवी आहे काय, असे म्हणत चौघांनी वाल्मिकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यातील एकाने कारमधून लाकडी दांडका काढून वाल्मिकला मारहाण केली. मारहाण रस्त्यात सुरु असल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. त्यानंतर मारहाण करणार्या दोन तरुणांसह तरुणीने वाल्मिकला रिक्षात बसवून पंचवटी पोलीस ठाण्यात आणले.

पोलिसांनी गंभीर मारहाण झाल्याचे पाहून वाल्मिकला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. विचारपूस केली असता त्याने आपबिती सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून युवतीसह चौघांवर गुन्हा मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com