
डुबेरे | प्रतिनिधी | Dubere
शेतातील काम (Farm Work) उरकून घराकडे जात असताना विजेचा धक्का (Electric Shock) लागून एका तरुण शेतकऱ्याचा (Farmer) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, शरद कारभारी वामने (४०) असे मृत्यू (Death) झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शरद वामने हे कुटुंबासह शेतात काम करण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेतातील काम उरकल्यानंतर अकरा वाजेच्या सुमारास ते घराकडे परतत होते. त्यावेळी दोन ते तीन दिवसांपासून पावसाची (Rain) परिसरात रिपरिप सुरू असल्याने बांधावरून त्यांचा अचानक पाय घसरला.
त्यानंतर विजेच्या खांबासाठी असलेल्या तारेला त्यांच्या हाताचा स्पर्श झाला. त्यामुळे शरद वामने यांना विजेचा जोरदार धक्का बसल्याने ते बेशुद्ध झाले. यावेळी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, शरद वामने यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. तसेच शरद यांच्या निधनामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला असून वीज वितरण कंपनीने त्यांना भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच ज्ञानेश्वर ढोली, माजी सरपंच अर्जुन वाजे, रामनाथ पावशे, शिक्षक नेते अंबादास वाजे, कारभारी वारुंगसे यांच्यासह आदींनी केली आहे.