
नाशिक । प्रतिनिधी Nashik
डॉ. दिलीप यार्दी ज्येष्ठ पक्षीमित्र आहेत. ते औरंगाबाद तेथे राहतात. पक्ष्यांचे अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे. पक्षी निरीक्षण करता करता त्यांनी आतापर्यंत पक्ष्यांचे लाखो फोटो काढले आहेत. पक्षी सप्ताहानिमित्त त्यांची मुलाखत.
प्रश्न : राज्यात अनेक पाणथळ जागा आहेत. त्यात नांदूरमध्यमेश्वर आणि जायकवाडी या जागा वैशिष्ट्यपूर्ण मानल्या जातात. त्यांची काय वैशिष्ट्ये आहेत?
उत्तर : या दोन्ही पाणथळ जागा उथळ आहेत. त्यामुळे तिथे दलदल मोठ्या प्रमाणात दिसून येतात. या दलदलीमुळे पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. दलदल ही पक्ष्यांचा अधिवास मानली जाते. विस्तीर्ण पात्र हे जायकवाडीचे दुसरे वैशिष्ट्य आहे. ते 339 स्क्वेअर किलोमीटर आहे. या जलाशयाच्या सर्व भागात सूर्यप्रकाश थेट तळापर्यंत जाताना दिसतो. एवढे ते उथळ आहे. यामुळे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होते. अशी प्रक्रिया जिथे होते तिथे ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात तयार होतो आणि पाण्यात मिसळतो. ते पाण्याच्या शुद्धतेचे एक मानक आहे. जायकवाडीचे पाणी अद्यापही शुद्ध आणि पिण्यायोग्य आहे. पण आता त्यात सांडपाणी मोठ्या प्रमाणावर सोडले जाते. हे असेच सुरू राहिले तर हा इतका विस्तीर्ण जलाशय काही कामाचा उरणार नाही. नांदूरमध्यमेश्वरला स्थलांतरीत पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नांदूरमध्यमेश्वर ‘रामसार’ स्थळ घोषित झाले आहे. पाणथळ जागेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर रेकग्निशन म्हणजे रामसार. जायकवाडीलाही रामसार म्हणून मान्यता मिळाली असून त्याची कधीही घोषणा होऊ शकेल.
प्रश्न : ‘रामसार’ दर्जा घोषित होण्यामुळे काय फरक पडेल?
उत्तर : अशा पाणथळ स्थळांचे संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर तांत्रिक आणि आर्थिक मदत मिळते. या स्थळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष ठेवले जाते.
प्रश्न : सांडपाणी अशा पाणथळ जागेत मिसळले तर पक्ष्यांना कोणते धोके उत्पन्न होतात?
उत्तर : शेवाळ आणि पाणवनस्पती मोठ्या प्रमाणात वाढतात. त्यामुळे पाण्याचा पृष्ठभाग हिरव्या वनस्पतीने व्यापला जातो. मग सूर्यप्रकाश पाण्यात जात नाही. प्रकाश संश्लेषण होत नाही. ऑक्सिजन तयार होत नाही. अशा वनस्पती ज्या जलाशयात मोठ्या प्रमाणात वाढतात त्या तलावाचे नष्टीकरण सुरू झाले असे मानले जाते.
प्रश्न : जैवविविधतेच्या साखळीतील पक्ष्यांचे महत्त्व.
उत्तर : जैवविविधतेतील अन्नसाखळी आपण लक्षात घेतली पाहिजे. ढोबळमानाने प्राण्यांचे पाच भाग पडतात. पहिले अस्थिविरहित आणि दुसरे अस्थिमय. अस्थिमयात पाच भाग पाडतो. पाण्यातील मासे, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि पाचवे सस्तन प्राणी. यापैकी चार भागांचा अभ्यास आपण मोठ्या प्रमाणात केला आहे. पण पक्ष्यांचा अभ्यास कुठेच केलेला नाही. पक्षी हा विषयच शालेय स्तरापासून पुढे कुठेच शिकवला जात नाही. कारण ज्या गोष्टीची आपल्याला चणचण भासते त्याचा आपण शोध घेतो, त्यांचे संवर्धन करण्यासाठी उपाययोजना करतो. पण पक्षी माणसाच्या खूप जवळ आहेत. जिथे माणूस तिथे पक्षी. त्याची चणचण भासायचा प्रश्नच येत नाही. म्हणून आपण त्यांच्याकडे विशेष लक्ष देत नाही. पण जैवविविधतेच्या साखळीतील पक्ष्यांचे उपयोग सांगायला कशाला हवेत? आताही पक्षी निरीक्षण करायला लोक जातात.
त्यातील खूप जण त्याकडे ट्रिप किंवा विरंगुळा म्हणून पाहतात. वास्तविक पाहता हजारो किलोमीटरवरून पक्षी आपल्याकडे येतात. त्यांचा आता कुठे थोडासा अभ्यास सुरू झाला आहे. पण त्याचे गूढ अजूनही उकललेले नाही. डॉ. सालीम अली असे म्हणतात, माणूस पक्ष्यांशिवाय राहू शकत नाही, पण पक्षी मात्र माणसाशिवाय राहू शकतात. उदारहणार्थ, चिमण्या कमी झाल्या आहेत. त्याचा दोष मोबाईल टॉवरला दिला जातो. मुळात चिमणी माणसाच्या घरात राहते. पूर्वी घरात फ्रेम असायच्या. त्या आता नाहीत. खिडक्यांना जाळी आली. त्यातून चिमणी आत येईल का? चिमण्यांना आपण अशा पद्धतीने आपल्या घरातून हाकलले. बाहेर त्या शत्रूच्या तावडीत सापडतात. दुसरे पूर्वी बैल खळे चालवत. त्यामुळे बरेचसे दाणे खळ्याबाहेर पडायचे. ते खायला चिमण्या यायच्या. आता मशीन आले. पूर्वी भांडी घराबाहेर घासली जात. खरकटे बाजूला टाकले जायचे. ते खायला चिमण्या यायच्या. तेही राहिले नाही. पूर्वी एका झाडावर शेकडो चिमण्या रात्री वस्तीला यायच्या. आता ती झाडे राहिली नाहीत. चिमण्या कमी व्हायला अशी कितीतरी कारणे आहेत. ही प्रमुख कारणे आपण दुर्लक्षित करतो आहोत.
प्रश्न : सगळेच पक्षी जगताचा घन अभ्यास करतील असे नाही. पण पक्ष्यांबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी लोक कोणत्या छोट्या गोष्टी करू शकतात?
उत्तर : पक्षी बघायला सुरुवात करा. त्यांच्यासाठी पाणी आणि दाणे ठेवा. त्यांना हाकलू नका. पक्षी दिसले की आरडाओरडा करू नका. कृत्रिम घरटी घराच्या बाहेर आणि घरातही लावा. पक्षी यायची वाट बघा. पक्ष्यांना काहीतरी मिळेल अशी झाडे घराभोवती लावा. उदा. तुतीचे, अंजिराचे झाड. पक्ष्यांना आवडेल असा बागबगीचा फुलवला तर पक्षी आपोआप येतात. तुम्हाला काहीही करावे लागत नाही. पक्ष्यांना आदर द्या. ते तुमच्या जवळ येतील. एवढे जरी केले तरी पक्षी खूप साथ देतील. त्यांना जगू द्या. तुम्हीही शांतपणे जगा.