येवला : ‘सुलभ पीककर्ज’चा लाभ घ्या : कासार

अभियानाची शेवटची तारीख १० जुलै पर्यंत
येवला : ‘सुलभ पीककर्ज’चा लाभ घ्या : कासार

येवला । प्रतिनिधी

शेतकर्‍यांना खरीप हंगामात पीककर्ज सहज उपलब्ध व्हावे, याकरीता सुलभ पीककर्ज अभियान तालुक्यात राबविण्यात येत आहे. याचा शेतकरी सभासदांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सोपान कासार यांनी केले आहे.

खरीप पीककर्ज वाटपाबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येथील आढावा बैठक घेतली. तालुक्यातील सन २०२०-२१ चे खरीप पीककर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सुलभ पीककर्ज अभियान राबविण्यात यावे, यासाठी भुजबळ यांनी सूचना केली होती. त्यानुसार उपविभागीय अधिकारी कासार यांनी २९ जून रोजी तालुक्यातील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली.

जास्तीत जास्त शेतकर्‍यांना पीककर्ज वाटप करून तालुक्याचा इंष्टांक पूर्ण करावा व कोणताही पात्र शेतकरी पीककर्जापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना उपविभागीय अधिकारी कासार यांनी या बैठकीत केल्या.

तसेच शेतकर्‍यांना सुलभ कर्ज वाटप व्हावे, यासाठी सुलभ पीककर्ज अभियानाचा आराखडा तयार करण्यात आला. हे अभियान २६ जूनपासून ते १० जुलै कालाधीत जिल्हा बँकेच्या तालुक्यातील एकूण १२ शाखेत तसेच राष्ट्रीयकृत बँकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व गावांमध्ये राबविण्यात येणार आहे.

सदर अभियानात शेतकर्‍यांना फॉर्म भरून देणे व त्यासाठी लागणारे कागदपत्रे, कर्जाची माहिती यासाठी सहकार खात्याचे अधिकारी, राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी, जिल्हा बँकेचे अधिकारी, वि. का. संस्थेचे सचिव, तलाठी हे मार्गदर्शन करून मदत करणार आहे.

या अभियानाचा सर्व शेतकरी सभासदांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी कासार यांनी केले आहे. या बैठकीस तहसीलदार रोहिदास वारुळे, सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील, सहकार अधिकारी आर. पी. जाधव, जिल्हा मध्यवर्ती बँकांचे व राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com