येवला मर्चंट बँक निवडणूक : समृद्धी पॅनलचा दणदणीत विजय

प्रगतीला अवघ्या ३ जागा; मतमोजणी साठी लागले २२ तास
येवला मर्चंट बँक निवडणूक :  समृद्धी पॅनलचा दणदणीत विजय

येवला | प्रतिनिधी Yeola

अत्यंत चुरशीच्या झालेल्या येवला मर्चंट्स बँकेच्या निवडणूकीत (Yevla Merchants Bank Elections) समृद्धी पॅनलने बाजी मारत १२ जगावर दणदणीत विजय मिळवला, तर प्रगती पॅनलला अवघ्या ३ जागांवर मतदारांनी कौल दिला. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.

रविवार दि. १३ रोजी मतदान झल्यानंतर काल येवला मनमाड रस्त्यावरील सिद्धार्थ लॉन्स येथे प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. मात्र प्रगती पॅनलचे उमेदवार जसजसे मागे पडत चालले, तसतशी त्यांची चलबिचल होण्यास सुरूवात झाली. मतपत्रिका बांधण्यासाठी असलेल्या रबराच्या रंगावरून, तर इतर वेगवेगळ्या कारणावरून त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दुपारी १२ वाजता मतमोजणी बंद पाडण्यात आली, पुन्हा मतमोजणीचा आग्रह धरण्यात आला. त्यामुळे रात्री ८ वाजेपर्यंत अपेक्षित असलेला निकाल हाती येण्यास तब्बल २२ तासानंतर मतमोजणी पहाटे ६ वाजता संपली.

नोटबंदी नंतर सतत चर्चेत असलेल्या येवला मर्चंट बँकेच्या निवडणुकीसाठी रविवार दि. १३ रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत किरकोळ बाचाबाची वगळता मतदान शांततेत पार पडले होते. एकूण १४६७५ मतदार संख्येपैकी ८२३६ म्हणजेच ५६.१२ टक्के मतदान झाले होते.

गट निहाय उमेदवार व कंसात त्यांना मिळालेली मते सर्वसाधारण गट :

बालुशेठ परदेशी (४२१३), सुहास भांबरे (४०७२), सोनल पटणी (४०६७), पूजा काबरा (३७२६), नितीन काबरा (३६८२), डॉक्टर महेश्वर पगारे (३६२७), महेश भांडगे (३६१३), प्रमोद सस्कर (३५६३), राहुल गुजराथी (३५४३), चंद्रकांत कासार (३५४१) हे १० उमेदवार सर्वसाधारण गटात निवडून आले. या गटात शरद लहरे यांचा अवघ्या २४ मतांनी पराभव झाला.

अनुसूचित जाती जमाती गटात राष्ट्रवादीचे सुभाष गांगुर्डे (३४८७) या गटात प्रगतीचे उमेदवार सुनील पवार यांना अवघी २५४६ मते मिळाली, त्यांचा तब्बल ९४१ मतांनी पराभव झाला.

विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गात सारिका मनोज दिवटे यांना ४११५ मते मिळाली.

महिला राखीव गटात छाया देसाई यांना ४०८२, तर सोनल राजपूत यांना ३५६९ मते मिळाली. या गटात ५ महिला उमेदवार होत्या.

इतर मागास प्रवर्गात प्रज्वल पटेल यास ४०३२ मते मिळाली. तर भाजपाचे माजी नगराध्यक्ष व येमकोचे माजी संचालक बंडू क्षिरसागर यांना अवघी ३०८२ मते मिळाल्याने त्यांचा दारुण पराभव झाला.

बँकेच्या एकूण सभासद मतदार संख्या १४६७५ इतकी आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा ह्यावेळी मतदारांची नव्याने वाढ झाली आहे.

मतदान प्रक्रिया ही विंचूर रोड येथील जनता विद्यालय येथील ३० बुथवर पार पडली होती. एका बुथवर ५०० इतकी मतदार संख्या निश्चित करण्यात आली होती, तर मतदान केंद्रावर मतदारांची गैरसोय होवुन नये याची दक्षता प्रशासनाकडुन घेण्यांत आली होती. प्रत्येक बुथवर १ केंद्राध्यक्ष, ५ कर्मचारी, २ पोलीस कर्मचारी अशी नेमणूक करण्यात आली होती. सहा. निबंधक प्रताप पाडवी, जितेंद्र शेळके व सहाय्यक विजय बोरसे व त्यांच्या चमूने मतमोजणी पक्रिया पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

येवला मर्चंट बँक संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीत सर्वसाधारण १० जागेसाठी २७ उमेदवार रिंगणात होते. तर महिला राखीव २ जागांसाठी ५ उमेदवार निवडणूक लढवीत होत्या. तसेच अनु.जाती जमातीच्या एका जागेसाठी तिघे उमेदवार तर इतर मागास प्रवर्गाच्या एका जागेसाठी चार उमेदवार तर भटक्या जाती जमाती प्रवर्गाच्या एका जागेसाठी ३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. संचालक मंडळाच्या एकूण १५ जागेसाठी ४४ उमेदवारांनी निवडणूक लढविली.येवला मर्चंट बँकेच्या १५ संचालकांच्या पंचवार्षिक निवडणुकीत समृद्धी पॅनल, प्रगती पॅनल व जगदंबा पॅनल रिंगणात होते.

बोगस मतदानाचा प्रयत्न फसला

मतदान सुरू झाल्यानंतर अवघ्या काही वेळात एकलहरे येथील एकाने दुसऱ्या मतदाराच्या नावावर मतदान करण्याचा प्रयत्न केला. मात्र मतदान प्रतिनिधींच्या लक्षात ही बाब आल्याने त्यास रोखण्यात आले. पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवताच त्याने कबुली दिल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने बोगस मतदानाचा प्रयत्न फसला. तो यशस्वी झाला असता तर बोगस मतदानाची संख्या वाढून समृद्धीचा विजय कठीण झाला असता, अशी चर्चा सुरू होती.

'ती' चलचित्रफितही प्रगतीस भोवली

बँकेची मोठे कर्ज वितरणाची ऐपत नसताना कर्ज वितरण व इतर कामांबाबत भाजपचा माजी नगराध्यक्ष आग्रह करीत असलेली एक चलचित्रफित मतदानाच्या दोन दिवस अगोदर सभासदांच्या मोबाईल वर येऊन धडकली. अन मतदारांच्या मनात चलबिचल सुरू झाली. 'त्या' चलचित्रफितीचा परिणाम निकालावर झाला. ती चलचित्रफित प्रगतीस मारक ठरली, तर समृद्धीचा विजय सुकर झाला.

पत्रकबाजीने केली मतदारांची जागृती

बँक निवडणूक प्रचाराचा धुरळा उडू लागताच येवल्यात विविध पत्रके प्रसिद्ध झाली. या पत्रकांनी बँकेचे सभासद असलेल्या मतदारांची जागृती केली. तर "आम्ही मतदार बोलतोय" या शिर्षकाने प्रसिद्ध झालेल्या पत्रकात पॅनल निर्मिती, कर्ज वितरण, सभादांना मूर्ख समजणे, आदी बाबींचा उहापोह करीत पॅनल निर्मात्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. तर भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे दीपक पाटोदकर यांनीही पत्रक प्रसिद्ध करून मतदारांना योग्य उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. तर दोन पानी निनावी पत्रकानेही सभासद मतदारांच्या ज्ञानात भर टाकली. त्यामुळे समृद्धीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

लहरेंचा व कासलीवाल यांचा निसटता पराभव

समृद्धी पॅनलचे धडाडीचे शिलेदार शरद लहरे व अलकेश कासलीवाल यांनी संपूर्ण पॅनलचा प्रचार जोमाने केला. मात्र शरद लहरे यांचा अवघ्या २४ मतांनी पराभव झाला. तर अलकेश कासलीवाल यांचाही थोड्या मतांनी पराभव झाला. प्रगतीचे राहुल गुजराथी यांना विजयी उमेद्वारात सर्वात कमी मतदान झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com