२६ जानेवारीपासून येरवडा होणार पर्यटकांसाठी खुले; नाशिकच्या सेन्ट्रल जेल चाही समावेश

२६ जानेवारीपासून येरवडा होणार पर्यटकांसाठी खुले; नाशिकच्या सेन्ट्रल जेल चाही समावेश

पुणे | प्रतिनिधी

राज्यात कारागृह पर्यटनाचा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य केला आहे. त्यासाठी प्रथम पुणे येथील येरवडा कारागृहाची निवड करण्यात आली असून २६ जानेवारी रोजी उद्घाटन होणार आहे. त्यानंतर नाशिक, ठाणे नागपूर कारागृहात टप्प्याटप्प्याने कारागृहात पर्यटन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी दिली...

स्वातंत्र्य लढ्यातील अनेक थोर नेत्यांनी पुण्यासह ठाणे आणि नाशिक मधील कारागृहात कारावास भोगला.

या कारागृहांना एक ऐतिहासिक समृद्ध वारसा लाभला असून तो वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा यादृष्टीकोनातून विशेष प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून त्याची घोषणा देशमुख यांनी आज मुंबईत केली.

दक्षिण आशियात येरवडा हे पुण्यातील प्रमुख कारागृह आहे. स्वातंत्र्य पूर्व काळात महात्मा गांधी यांच्यासह जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू , स्वातंत्र्यवीर सावरकर असे महापुरुष काही काळासाठी येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते.

राज्यात कारागृह पर्यटनाचा नवा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्यासाठी पुणे , ठाणे आणि नाशिकच्या कारागृहाची निवड करण्यात आली आहे.

इतिहासाचे अभ्यासक, त्याचबरोबर विद्यार्थी आणि संशोधकांसाठी ही कारागृह भेट मोफत ठेवण्याची तयारी असल्याचे या प्रस्तावात नमूद करण्यात होते, मात्र वयोगटानुसार शुल्क आकारले जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

दुपारी १२ ते ३ या कालावधीत कारागृहातील सध्याच्या कैद्यांना त्यांच्या कोठडीतच बंद ठेऊन केवळ पर्यटकांसाठी कारागृह खुले ठेवण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यातील प्रतिसाद पाहून राज्यातील इतर कारागृहात टप्याटप्याने य योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com