येवला : आरोग्य विभागाची विशेष मोहीम

तालुक्यातील ग्रामीण भागातही आता घरोघरी पाहणी
येवला : आरोग्य विभागाची विशेष मोहीम

येवला । प्रतिनिधी Yevla

शहरासह तालुक्यातील करोनाची संपर्क साखळी खंडीत करण्यासाठी आरोग्य विभाग विशेष मोहीम राबवत आहे. शहरात घरोघरी आरोग्य तपासणी केली जात असतांना, तालुक्यातील ग्रामीण भागातही आता घरोघरी पाहणी करून आरोग्य तपासणी केली जात आहे. या कामी प्राथामिक व माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे .

तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्यकेंद्र असून या आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील सर्वच मोठ्या गावांत प्रथम घरोघरी जावून पाहणी व आरोग्य तपासणी केली जात आहे. या मोहीमेसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने आयआर थर्मामीटर व पल्स ऑक्सीमीटर उपलब्ध करून दिले गेले आहे. या मोहीमेत तालुक्यातील राजापूर, नगरसूल, अंदरसूल, मुखेड, सावरगाव, पाटोदा या गावांमध्ये सध्या पाहणी व आरोग्य तपासणी सुरू आहे.

या मोहिमेत सर्दी, खोकला, ताप, श्वसनाचा त्रास असलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करून पुढील प्रत्येक आठवड्यात दोन दिवस नियमित माहिती घेवून तपासणी केली जात आहे. साठ वर्षांपेक्षा अधिक वय असणार्‍या वृद्ध तसेच दमा, मधुमेह, थायरॉईड, किडनी, अस्थमा, कॅन्सर, बायपास यासारखे इतर दुर्धर आजाराने ग्रस्त असणार्‍या रूग्णांकडे वैयक्तिक लक्ष देऊन पुढील काही दिवस नोंदी ठेवल्या जात आहेत.

शहरात प्राथमिक व माध्यमिक शिाक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य सेवक-सेवीका यांच्या माध्यमातून सदर पाहणी व तपासणी सुरू असून मोठी गावे झाल्यानंतर इतर गावांची पाहणी व आरोग्य तपासणी केली जाणार आहे. संपूर्ण तालुक्याचीच पाहणी व आरोग्य तपासणी करून त्यातून आढळून येणार्‍या संशयीत व इतर दुर्धर रूग्णांना औषधोपचार व प्रतिकार शक्ती वाढवणारी औषधी दिली जाणार असल्याचे तालुका ग्रामीण करोना नोडल ऑफिसर डॉ. शरद कातकडे यांनी सांगितले .

पाहणी व आरोग्य तपासणीस काही लोक सहकार्य करतात. परंतु, काही ठिकाणी लोक पल्स मशीनद्वारे तपासणी करण्यास विरोध करत आहेत. पुरेशा संरक्षित उपयोजनांसह सदर तपासणी केली जात असल्याने नागरिकांनी विरोध न करता, न घाबरता आरोग्य विभागास सहकार्य करून आरोग्य तपासणी करून घ्यावी.

डॉ. शरद कातकडे, ग्रामीण करोना नोडल ऑफिसर येवला

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com