
मालेगाव । प्रतिनिधी Malegaon
उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीक्षेत्र चंदनपुरी (Chandanpuri )येथील श्री खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवास ( Khanderao Maharaj Yatra )शाकंबरी पौर्णिमेस शुक्रवार 6 जानेवारीपासून भक्तिभावपूर्ण वातावरणात प्रारंभ होत आहे. करोना संक्रमणामुळे दोन वर्षे बंद राहिलेला यात्रोत्सव यंदा होत असल्याने मल्हार भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
चंदनपुरी येथे खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची उपस्थिती राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर यात्रोत्सव सुरळीत पार पडावा. या दृष्टिकोनातून जय मल्हार ट्रस्ट, ग्रामपंचायत, पोलीस-प्रशासन यंत्रणेतर्फे बैठक घेण्यात येवून सुविधा व उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. खंडेराव महाराज व भगवती बाणाईमातेच्या मंदिरास रंगरंगोटीसह फुलांनी सुशोभित करण्याचे काम पूर्णत्वास आले असून आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ट्रस्टतर्फे 16 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहे.
शाकंबरी पौर्णिमेपासून खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. 15 दिवस सुरू राहणार्या या यात्रेच्या काळात राज्यातून लाखो भाविक हजेरी लावत खंडेराव महाराजांचे दर्शन घेणार आहेत. या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीतर्फे संपूर्ण चंदनपुरीत स्वच्छता अभियान राबविण्यात येवून पिण्याचे पाणी व आरोग्य सुविधांचे नियोजन हाती घेण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांसह आरोग्य कर्मचारी उपस्थित राहण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या असून भाविकांची गैरसोय होवू नये या दृष्टिकोनातून सर्व उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. मंदिर परिसरात मल्हार भक्तांचे दर्शन सुलभ व्हावे या दृष्टिकोनातून स्वयंसेवक देखील नियुक्त केले जाणार असल्याची माहिती सरपंच विनोद शेलार यांनी दिली.
शाकंबरी पौर्णिमेस सकाळी पालकमंत्री दादा भुसे, निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर, बारा बलुतेदार मंडळाचे संस्थापक बंडुकाका बच्छाव, भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, भाजप गटनेते सुनील गायकवाड आदी मान्यवरांच्या हस्ते खंडेराव महाराजांची महापूजा मंदिरात केली जाणार आहे.
गत अनेक वर्षाच्या या परंपरेचे पालन करण्यासाठी मल्हार भक्त सज्ज झाले आहेत. मशाल ज्योत आणण्यासाठी खंडेराव महाराज मंदिराचे पुजारी तुकाराम सूर्यवंशी, साहेबराव सूर्यवंशी, रामकृष्ण सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी, सदाशिव सूर्यवंशी, मुरलीधर सूर्यवंशी आदींसह भाविक गेलेे आहेत. त्यां भाविकांना ट्रस्टचे अध्यक्ष सतीश अहिरे, सरपंच विनोद शेलार, उपसरपंच सविता सोनवणे, सोसायटी चेअरमन डी.एफ. पाटील आदींनी सन्मानपूर्वक निरोप दिला.
मशाल ज्योतीसाठी भाविक रवाना
श्री खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त जेजुरी येथून प्रज्वलीत केलेली मशाल चंदनपुरी येथे आणण्यात येवून मंदिरातील ज्योत प्रज्वलीत केली जाणार असल्याने जेजुरी येथून मशाल ज्योत आणण्यासाठी चंदनपुरी येथून दोनशेपेक्षा अधिक मल्हार भक्त रवाना झाले आहेत.
जेजुरी येथून आणलेल्या मशाल ज्योतीची सवाद्य मिरवणूक गावातून काढण्यात येवून ती मंदिरात नेली जाणार आहे.