नाशिक । Nashik

नाशिक शहर परिसरात गेल्या दोन दिवसापासुन सुरू झालेल्या संततधार पाऊसामुळे शहरातील अनेक भागात रस्त्यावर पाणी साठत असल्याने पुन्हा खड्ड्यात भर पडली आहे.

मागील आठवड्यात आयुक्त व महापौरांनी खड्डे बुजविण्यासंदर्भात निर्देश दिल्यानंतर शहरात सुरू असलेला पाऊस थांबलेला नाही.

परिणामी शहरातील मुख्य बाजारपेठेपासुन ते उपनगरांतील रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात लक्षणिय वाढ झाली आहे. परिणामी नागरिकांना वाहन चालवितांना जीवमुठीत धरुन चालावे लागत असल्याने यासंदर्भात शहरात तीव्र प्रतिक्रीया उमटली आहे.

ऑगस्टच्या दुसर्या आठवड्यात नाशिक शहरात रिमझिम स्वरुपात सुरू झालेला पाऊसाने शहरातील रस्त्यांची दुरावस्था करुन टाकली आहे. श्रावणातील कमी अधिक पाऊसाने शहरभर खड्डे केले होते. यात विशेषत: शहरातील 21 खेडी भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असुन कॉलनी भागातील रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे.

काही महिन्यापुर्वी कॉलनी भागात तयार करण्यात आलेले रस्त्यांची अवस्था खड्ड्यात रस्ता अशी झाली आहे. तसेच शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा, शालीमार, मेनरोड अशा भागात देखील रस्त्यावर लहान मोठे खड्डे झाले आहे.

शहरातील रस्त्यांची दुरावस्थेसंदर्भातील तक्रारींची दखल घेत तत्कालीन आयुक्त गमे व महापौर सतिश कुलकर्णी यांनी बांधकाम विभागाला तात्काळ खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मात्र शहरात संततधार पाऊस सुरू झाल्यानंतर शहरातील खड्ड्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

यात उपनगर व कॉलनी भागात तर रस्त्यात चिखल झाल्याचे दिसुन येत आहे. अशाप्रकारे सर्वत्र खड्ड्याचे साम्राज्य पसरल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरुन चालावे लागत आहे. यामुळे शहरात तीव्र प्रतिक्रीया उमटू लागल्या आहे.