
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जागतिक आदिवासी दिन शहरात अमाप उत्साहात साजरा झाला. शहरात भव्यशोभा यात्रा काढून आदिवासी तरुण बांधवांनी जल्लोष केला. जिल्ह्यातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र मणिपूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अनेक संघटनांनी शांततेत हा दिवस साजरा करुन मोर्चाचे आयोजनही केले...
आज दुपारी आदिवासी विकास परिषदेकडून शोभायात्रा पंचवटीतून आयोजन करण्यात आले. पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅन्ड, गोदाघाट, रविवार कारंजा, शालिमारमार्गे सीबीएस, त्र्यंबकनाका येथून ते गोल्फ क्लब मैदान अशी शोभायात्रा काढण्यात आली.
दुपारी गोल्फ क्लब मैदान येथे शोभायात्रेचा समारोप झाला. यामध्ये राज्यभरातील आदिवासी कलावंतांची पथके सहभागी झाली. पारंपरिक आदिवासी जीवनाचे नाशिककरांना दर्शन घडविले. या रॅलीमध्ये आदिवासी बांधवांकडून त्यांची पारंपारिक वेशभूषा धारण करून पारंपरीक वाद्यावर नृत्य साजरे करण्यात आले होते. ढोल ताश्यांच्या गजरात नाचत आदिवासी दिनानिमित्त ही मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी चौकाचौकात असलेल्या महापुरूषांच्या पुतळ्यांना आदिवासी संघटनेच्या पदाधिकार्यांकडून पुष्पहार अर्पण करून अभिवादन देखील करण्यात आले. त्यानंतर जागतिक आदिवासी दिनाचा भव्य कार्यक्रम नाशिकच्या गोल्फ क्लबवर मैदानावर झाला. या कार्यक्रमासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.
बिरसा ब्रिगेडचा मोर्चा
बिरसा ब्रिगेड यांच्या वतीने मणिपूर येथील अत्याचाराच्या निषेधार्थ केंद्र शासनाच्या विरोधात मोर्चा काढला. सकाळी 11 वाजता गोल्फ क्लब मैदान येथून मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी अनेक समविचारी पक्ष आणि संघटना मोर्चात दर्शन सहभागी झाल्या. या मोर्चासाठी ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश पेंदाम उपस्थित होते. गोल्फ क्लब मैदान येथून निघालेला मोर्चा त्र्यंबकरोडने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला. त्यानंतर निवेदन देण्यात आले.