जागतिक परिचारिका दिवस : करोना रुग्णांच्या सेवेचा अभिमान वाटतो!

परिचारिकांच्या भावना..
जागतिक परिचारिका दिवस :  करोना रुग्णांच्या सेवेचा अभिमान वाटतो!
USER

नाशिक । प्रतिनिधी

आज जागतिक परिचारिका दिवस! आद्य परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस. संपूर्ण जग करोनाशी लढा देत आहे. परिचारिका आपला जीव धोक्यात घालून करोना रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांना संसर्गाची भीती वाटत नाही का? करोना वॉर्डात काम करताना येणार्‍या ताणतणावावर त्या कशी मात करतात? प्राणवायूचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी काय उपाय योजतात? आपल्या रुग्णांची आणि कुटुंबियांचे समुपदेशन कसे करतात? याविषयी विविध रुग्णालयात करोना वॉर्डात सेवा बजावणार्‍या परिचारिकांशी साधलेला संवाद..

रुग्णांनाही कुटुंब असतेच ना!

आमच्या रुग्णालयात जेव्हा पहिला करोना रुग्ण दाखल झाला तेव्हा करोना वॉर्डात माझी ड्युटी होती. सुरुवातीला त्याचा फार ताण आला होता. स्वतःबरोबरच कुटुंबाचीही काळजी वाटली. घरचेही थोडेसे घाबरले होते. पण मग विचार केला, जे रुग्ण आमच्याकडे दाखल होतात त्यांनाही कुटुंब असते. त्यांनाही आपल्या कुटुंबाची काळजी वाटत असते. आपण पटकन बरे होऊन घरी परत जावे अशाच त्यांच्या भावना असतात. ते आमच्या रुग्णालयात विश्वासाने दाखल झालेले असतात. ते त्यांच्या भावना आमच्याशी शेअर करतात. तो विश्वास कायम ठेऊन त्यांना बरे करून घरी पाठवणे हे कर्तव्य पार पाडल्याचे समाधान मोठे असते. बरे झालेल्या रुग्णांच्या प्रतिक्रियाही आमचा उत्साह वाढवतात. आम्ही रुग्णांची सेवा करतो तेव्हा आमच्याही कुटुंबाची काळजी कोणीतरी घेतच असतो यावर माझा विश्वास आहे. आपले सैनिक सीमेवर तैनात असतात. ते कधी तक्रार करतात का? आम्ही करोना रुग्णांच्या सेवेत असतो याचा खूप अभिमान वाटतो.

- सुवर्णा गांगुर्डे, श्री गुरुजी रुग्णालय

सातत्याने नियोजन करावे लागते!

राज्य कामगार विमा रुग्णालयात सध्या लसीकरण सुरू आहे. लसीकरणाच्या गर्दीमध्ये दमछाक होते. दिवसाला सहाशे ते सातशे नागरिकांना लस दिली जाते. रुग्णालयाबाहेर गर्दी होऊ नये म्हणून त्यांची रांग लावणे, क्रमाक्रमाने नोंदणी करून घेणे, लसीकरण केल्यावर काही काळ विश्रांतीसाठी बसवणे, त्यांचे समुपदेशन करणे, लसीचा काही परिणाम तर होत नाही ना याची तपासणी करून पुढील लसीकरणाची वेळ देणे या गोष्टी कराव्या लागतात. ही संपूर्ण प्रक्रिया सकाळी दहाला सुरू होते. त्याचे नियोजन नऊ वाजेपासून करावे लागते. सायंकाळी सहा ते सात वाजेला लसीकरण संपत असल्याने घरी पोहोचायला रात्रीचे नऊ वाजतात. याशिवाय रुग्णालय तपासणी स्थान, ऑपरेशन थिएटर या सर्व भागात कर्मचार्‍यांचा तुटवडा भासू नये यासाठी सतत दक्ष राहावे लागते. या संपूर्ण प्रक्रियेत स्वतःचे स्वास्थ्यही जपणे महत्वाचे असते. मात्र कुटुंबाच्या सहकार्यामुळे कामात लक्ष देणे शक्य होते.

- गीता बाणे, अधिसेवीका, इएसआयसी रुग्णालय.

प्रेमाचे शब्द औषधांइतकेच प्रभावी!

करोना रुग्णाला ठरलेली ट्रीटमेंट देण्याबरोबरच प्रेमाचे, धीराचे शब्द प्रभावी ठरतात. यातून रुग्ण लवकर बरा होण्यास मदत मिळते. करोना रुग्णांची सुश्रृषा करताना सुरुवातीला भीती व दडपण होते. हळूहळू ते कमी झाले. त्यासाठी मी व माझ्या घरच्यांनी सर्व नियमांचे पालन केले. सर्वच रुग्ण बरे होऊन घरी जावेत, असे वाटते. कोणतेही काम हातावेगळे करायची सवयच असल्याने दाखल झालेल्या रुग्णांना अँटीबायोटीक, रेमडेसिवीरचे डोस, मलमपट्टी, सलाईन देण्याचे काम न चूकता कायम ठेवले. यातून अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले. तसेच कुटुंबाचेही पाठबळ मिळाले. माझ्या कुटुंबाने मला करोना रुग्णसेवा करण्यासाठी कधी आडकाठी आणली नाही. आजही मी त्याच उमेदीने रुग्णसेवा करत आहे.

- वर्षा तेलोरे, बिटको कोविड सेंटर.

आपत्कालीन व्यवस्थेत आम्ही रुग्णांना धीर देतो!

मिस्टर रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहेत. त्यांनी लहान मुलं व घराची जबाबदारी सांभाळली आहे. म्हणून मी 24 तास लोकांच्या सेवेत आहोत. माझी किंवा माझ्यासारख्या सर्वांची रुग्णालयात जाण्याची वेळ निश्चितच आहे पण घरी परतण्याची नाही. अनेकदा प्राणवायूचा साठा मर्यादित आहे, तो सुरळीत सुरु ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी धावपळ करत आहेत असे लक्षात येते. अशा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना धीर देण्याचे काम आम्ही करतो. त्यांना परिस्थिती समजावून सांगतो. या रुग्णालयात मी करोना वॉर्डातच काम करणार आहे. माझा मुलगा आणि सूनही करोना रुग्णांची सेवा करत आहेत.

- संध्या सावंत, अधिसेवीका, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, नाशिक मनपा

रुग्णांना बरे होण्यास मदत करतो!

कोविड रूग्णालयात काम करताना खूप भले बुरे अनुभव घेतले. रूग्णांची चांगली सेवा केली. ते बरे होऊन घरी जाताना जणू काही आपले घर सोडून जातोय असे वाटून रडून सर्वांना भेटून आम्हाला आशिर्वाद देऊन गेले. रूग्ण कोणताही असो तो पुर्ण बरा व्हावा यासाठी कार्यरत राहणे त्यांना खाणे पिणे, योग्यवेळी औषधे, त्यांची इतर सेवा करण्यात कोणतीही परिचारीका मागे नाही. सध्याच्या कालावधीत कोवीडची भिती सर्वांच्या मनातून गेली आहे. आम्ही सहजपणे कोवीड सेंटरमध्ये वावरून कोवीड रूग्णांना मानिकस आधार देण्याचे काम करून त्यांना बरे होण्यास मदत करतो. याच्या परिणामी जिल्हा रूग्णायात रूग्ण बरे होण्याची टक्केवारी 85 ते 90 टक्क्यांपर्यंत आहे.

- योगिता आहेर, जिल्हा रुग्णालय

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com