जागतिक दुग्ध दिन विशेष : दूध व दुग्धजन्य पदार्थांंचे महत्व

जागतिक दुग्ध दिन विशेष : दूध व दुग्धजन्य पदार्थांंचे महत्व

नाशिक | प्रतिनिधी Nashik

दूध आणि दुधाचे सर्व पदार्थ ( Milk and all milk products) आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक आहेत. बहुतांशी मनुष्य प्राण्यांची सकाळ दुधापासून सुरू होऊन रात्री दुधापर्यंत समाप्त होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच दुधाची आवश्यकता असते.

आईच्या दुधानंतर मनुष्यासाठी गायीचे दूध हे सर्वोत्तम मानले जाते. दुधात अनेक पोषकतत्त्वे असल्यामुळे दुधाला पूर्णान्न म्हटले जाते. म्हणूनच आजही ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांमध्ये किमान एक तरी दुभती गाय आपल्याला बघावयास मिळते. याशिवाय म्हशीचे दूधदेखील तितकेच लोकप्रिय आहे.

का साजरा केला जातो जागतिक दुग्ध दिन?

दरवर्षी जगभरात 1 जून या दिवशी जागतिक दुग्धदिन साजरा केला जातो. 2001 पासून जागतिक दुग्धदिन साजरा करण्यास सुरुवात झाली. 1 जून या दिवशीच दूध दिवस साजरा करण्यात येऊ लागला कारण जगाच्या पाठीवरील अनेक देशांमध्ये याच तारखेला दुग्ध दिवस साजरा केला जात असे. मानवी शरीराला दुधाची असलेली गरज आणि त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठीच जागतिक दूधदिन साजरा केला जातो.

शेती हा भारतातील पारंपरिक व मुख्य व्यवसाय आहे. खेड्यापाड्यातील अनेक कुटुंबे आजही शेतीवर अवलंबून असतात. जेव्हा हरितक्रांती झाली त्यानंतर शेतीमध्ये अनेक बदल घडून आले. शेतीत वेगवेगळे प्रयोग सुरू झाले. बागायती शेती, फळांच्या लागवडीकडे शेतकर्‍यांचा ओढा वाढला. शेतीचे आधुनिकीकरण झाले. मात्र बहुतांशी कुटुंबांकडे मर्यादित शेतीमुळे तसेच अस्मानी संकटांमुळे पूरक व्यवसायाची गरज भासू लागली.

यातूनच पशुपालनाचा व्यवसाय बहरला आणि त्याद्वारे दुग्धव्यवसाय हा जोडधंदा म्हणून अनेकांच्या पसंतीस उतरू लागला. सुरुवातीच्या काळात असलेले जोडधंद्याचे स्वरूप काळानुरूप मुख्य व्यवसायात झाले. करण गेल्या काही वर्षांमध्ये दुग्धव्यवसाय चांगलाच विस्तारला. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून सुरू झालेला हा व्यवसाय आता मुख्य व्यवसाय बनला आहे. खेड्यातच नव्हे तर शहरी भागातदेखील आर्थिक उत्पन्नाचा प्रमुख स्रोत बनला आहे. दुग्ध क्रांतीनंतर हा व्यवसाय आणखी प्रवाहीपणे सर्वत्र पसरला आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला हातभार लागला.

दुधाचे फायदे

दुधामध्ये असणार्‍या पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता कमी असते. रक्तदाब नियंत्रित असल्याने हृदयावर ताण येत नाही. त्यामुळे हृदयासंबंधी कोणत्याही समस्या उद्भवत नाही. हृदयाचे कार्य चांगले राहण्यासाठी झोपताना दूध पिणे कधीही चांगले.

दूध पिण्यामुळे त्वचेसंबंधातील समस्या दूर ठेवण्यास मदत होते. दूध हे त्वचेला कोमल, मुलायम आणि चमकदार बनवते. दुधामध्ये त्वचेसाठीचे उपयुक्त असे सर्व व्हिटॅमिन्स आणि पोषकतत्त्वे असतात. त्यामुळे दिवसातून दोन ग्लास दुधाचे सेवन करणे गरजेचे आहे.

रात्री दूध प्यायल्यामुळे त्वचेसाठी बरेच फायदे होऊ शकतात. दुधात व्हिटॅमिन बी-12 असते जे त्वचेची लवचिकता सुधारण्यास मदत करते. दुधामध्ये असलेले व्हिटॅमिन-ए नवीन पेशी रचना तयार करण्यास मदत करते आणि त्वचेच्या विविध आजारांशी लढायला मदत करते. स्नायूंच्या विकासात दूध सहाय्यक ठरते. अनेक धावपटू व्यायाम केल्यानंतर दूध पिणे पसंत करतात. त्यामुळे स्नायूंना पोषक तत्त्वे मिळतात. दूध पिण्याने स्नायूंमधील वेदनाही दूर होते. मधुमेह रुग्णांच्या हाडांमध्ये अशक्तपणा असतो, ज्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवतो. त्यांच्यासाठी रात्री साखर न घालता अर्धा कप दूध पिणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे.

रात्री थोडी हळद घालून तयार केलेले कोमट दूध पिणे सर्दी आणि खोकल्याची लक्षणे दूर करण्यासाठी फायदेशीर नैसर्गिक उपाय ठरू शकतात. हळद दुधाचे अँटिऑक्सिडेंट आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. वजन कमी करण्याची चिंता न करता फक्त एक कप गरम दूध पिणे फायदेशीर आहे. दूध हे प्रथिनांचे स्रोत आहे जे रक्तातील साखरेचे योग्य स्तर राखण्यात आणि ऊर्जेची पातळी कमी करण्यास मदत करते. क्रीमपेक्षा कमी फॅट असलेले दूध अधिक प्रभावी आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com