जागतिक पितृदिन विशेष : आजचा 'बाप' माणूस

जागतिक पितृदिन विशेष : आजचा 'बाप' माणूस

नाशिक । ज्ञानेश्वर जाधव

वडिलांसाठी प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी जून महिन्याच्या तिसर्‍या रविवारी ‘फादर्स डे’ साजरा केला जातो. ‘फादर्स डे’ची मूळ कल्पना पाश्चात्य आहे. ती अमेरिकेतून आली आहे. कल्पना पाश्चात्य असली तरी आज जगभर ‘फादर्स डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. खरे तर बाप आपल्या इथला असो वा परदेशातला; थोड्या फार फरकात सगळीकडे ‘बाप हा बाप’च असतो.

खेड्यातला बाप अनेकदा आपण कथा-कवितांमधून जवळून पाहिला असेल. शेतावर काबाडकष्ट करून पोराला शाळेत पाठवणारा, पोराला शाळा-कॉलेज महाविद्यालयात जायला उच्चशिक्षण घेण्यासाठी पैसे पुरवणारा आणि पोटच्या गोळ्याच्या यशावर आनंदाश्रू गाळणारा, तो खरे तर निर्विवादपणे सर्व जगाचाच पोशिंदा आहे. त्याने कधी आपल्या पोराला/पोरीला जवळ घेऊन शिक्षण दिलेले नसते किंवा योग्य दिशा दाखवून इच्छित ध्येयापर्यंत जाण्यास मार्गदर्शन केलेले नसते. तरीदेखील तो बाप आपल्या कष्टातून, प्रेमातून, दृढ विश्वासातून आणि निरपेक्ष भावनेतून आपल्या मुलांना एक प्रकारे दिशा देत असतो.

आज अनेक शेतकर्‍यांची मुले-मुली स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारीपदे भूषवत आहेत. इतरही क्षेत्रात यशस्वी आहेत. खेड्यातला तोच बाप आता आधुनिक बाप म्हणून वावरत आहे. त्याला आज सगळे कळते. मुलगा-मुलगी हा भेद आता तो मानत नाही. त्याची मुलगीसुद्धा आज डॉक्टर, इंजिनिअर अशा उच्चशिक्षणासोबतच क्लास वन, क्लास टू अधिकारी म्हणून विविध क्षेत्रात उच्चपदांवर कार्यरत आहे. एवढे सगळे सांगण्याचा उद्देश एवढाच की आजच्या या स्पर्धात्मक सुपरफास्ट युगात कालचा ‘तो’ शेतकरी बाप आज आधुनिक नवा कोरा ‘स्मार्ट बाप’ झाला आहे.

शहरी बापदेखील कष्टाळू, धोरणी, शिक्षित असल्याने तो स्वतः आधीपासूनच बर्‍यापैकी स्मार्ट आहे. बालपणी-तरुणपणी मला जे मिळाले नाही ते माझ्या पोरांना मिळायला हवे, अशी त्याची धारणा असते. मुलांना योग्य दिशा, उत्तम करिअरसोबतच ते सर्व देण्यासाठी तो नेहमीच प्रयत्नशील असतो. त्यासाठी अगदी मूल जन्माला आल्यापासून त्याची लगबग सुरू होते. नोकरीवरून आल्यावर सायंकाळी कितीही थकलेला असो; तो मुलांच्या शिक्षणात जातीने लक्ष घालतो. मुलांना काय हवे-नको हे त्याला माहीत असते. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शहरी बापात आणि मुलांमध्ये कोणतेही अंतर नसते. तो मुलांना तितकाच फ्रेंडली वाटतो जितके त्यांचे शाळेतील मित्र! अशा प्रकारे बाप आणि मुलांची मैत्री हा शहरी मुला-मुलींच्या यशस्वी ध्येयाकडे जाणार्‍या रस्त्यातील महत्त्वाचा दुवा ठरतो.

पारंपरिक व आधुनिक गरजांची पूर्तता करणे एवढेच बापाचे पितृत्व नसते. त्यापलीकडेदेखील बाप-मुलांच्या नात्यातील भावविश्व म्हणजे बाप असतो. लेकराला इजा झाल्यास त्याच्या जखमेवर फुंकर घालणारी व्यक्ती आई असते. मात्र कठोर शब्दात मुलाला सुनावूनही आतून ते दुःख अनुभवणारा बापच असतो. बर्‍या-वाईट प्रत्येक परिस्थितीत आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ बनून कुटुंबाला सावरण्याचा यशस्वी प्रयत्न करणारा बाप असतो. एकूणच बाप हा इथून तिथून सगळीकडे सारखाच असतो. फक्त त्याच्या भावनांची पद्धत वेगवेगळी असते.

आज ‘फादर्स डे’ निमित्ताने सर्व जण आपापल्या वडलांबद्दल कृतज्ञता व्यक्त व्यक्त करतील. समाज माध्यमांवर व्यक्त होतील. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हा दिवस साजरा करतील. असे असले तरी एक दिवसापुरते बापाचे महत्त्व नक्कीच नसते ही गोष्ट सर्वांनाच ठाऊक आहे. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी दिवसरात्र कष्ट करणार्‍या सर्वांच्याच पप्पा, बाबा, दादा, आण्णा, भाऊ, नाना, तात्या, आबा यांना ‘फादर्स डे’च्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com